ही 'कर्जमाफी' फसवी, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली- अजित पवार

मिलिंद संगई
सोमवार, 19 जून 2017

जोपर्यंत जिल्हा बँकांना नव्या नोटा मिळत नाहीत तोवर शेतकऱ्यांना दहा हजारांचीही मदत करणे अवघड असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

बारामती : सरकारने केलेली कर्जमाफी म्हणजे ही फसवी असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम शासनाने केल्याचा घणाघाती आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केला. एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. 

पवार म्हणाले, दहा हजारांचा तातडीची मदत घोषित करुन आता आठवडा उलटून गेला तरी राज्यातील एकाही शेतक-याला ही मदत काही मिळालेली नाही. एकीकडे कर्जमाफीची घोषणा सरकारने केली मात्र अनेक निकष व अटी लावूनच हा निर्णय त्यांनी घेतला. घोषणा करायची पण फायदा कोणालाच मिळू द्यायचा नाही अशीच सरकारची मानसिकता दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रारंभापासूनच लढतो आहोत, आज सरकारने अनेक निकष कर्जमाफीसाठी लावलेले असलेले तरी त्यात बदल करायला विरोधी पक्ष म्हणून आम्ही भाग पाडू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राजकीय पक्षापेक्षाही एक शेतकरी म्हणूनच आम्ही या धोरणाचा विरोध करु असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या पदरात काही पडूच नये अशीच सरकारची मानसिकता दिसत असल्याचेही ते म्हणाले. 

नोटा बदलून मिळेपर्यंत मदत अशक्य
सरकारने हजार व पाचशेच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर पुणे जिल्हा बँकेसह राज्यातील जिल्हा बँकांनी जुन्या नोटा स्वीकारल्या. पण, न्यायालयाच्या आदेशानंतरही रिझर्व्ह बँकेकडून नोटा बदलून मिळत नाहीत. जोपर्यंत जिल्हा बँकांना नव्या नोटा मिळत नाहीत तोवर शेतकऱ्यांना दहा हजारांचीही मदत करणे अवघड असल्याचे ते म्हणाले. जिल्हा बँकांची स्थिती या एकाच निर्णयाने अवघड झालेली असून शेतकऱ्यांची बँक असलेल्या या जिल्हा बँकांबाबत सरकारचे धोरण आता शेतकऱ्यांपुढे आल्याचे दिसते, असेही ते म्हणाले. 
 

Web Title: pune news baramati news ajit pawar