बारामतीत लिलाव रोखले, बाजार समितीचे काम बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

सकाळी सहा वाजताच शेतकरी जळोची येथील बारामती बाजार समितीच्या उपबाजारात दाखल झाले. त्यांनी लिलाव पुकारण्यास सुरवात करणाऱ्या व्यापाऱ्यांना आवाहन करीत लिलाव बंद ठेवण्याची सूचना केली. त्याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. काही ठिकाणी तरीही लिलाव सुरू झाल्याचे समजताच आक्रमक शेतकऱ्यांनी हे लिलाव बंद पाडले. 

बारामती : राज्यभरात आजपासून पुकारण्यात आलेल्या शेतकरी संपाची झळ बारामतीला सकाळीच बसली. आक्रमक व संतप्त शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी जळोची येथील उपबाजारातील लिलाव आज सकाळी बंद पाडले, तर बाजार समितीच्या आवाराला कुलूप ठोकले. व्यापारी, आडते व विक्रेत्यांनी या संपाला पाठींबा देत येणाऱ्या बुधवारपर्यंत बाजार समितीतील सर्व लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे किरकोळ भाजीपाला विक्री करणाऱ्या मंडईतही शेतकऱ्यांनी धडक दिली. दोन दिवसापासून खरेदी झालेला शेतमाल आजच्या दिवस विकण्याचा निर्णय किरकोळ विक्रेत्यांनी घेऊन उद्यापासून मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

पुणतांब्यापासून सुरू झालेले शेतकरी संपाचे पडसाद आज बारामतीतही उमटले. आज बारामतीचा आठवडे बाजार असतो. त्यामुळे भाजीपाल्याची आवक आज तुलनेने जास्त असते. मात्र काल संध्याकाळी बारामती व इंदापूर तालुक्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बैठका होऊन संपाची तयारी झाली. त्यामध्ये ठरलेल्या नियोजनानुसार शेतकऱ्यांनी आज भाजीपाला घेऊन विक्रीसाठी जायचे नाही व कोणी आल्यास लिलाव होऊ द्यायचे नाहीत असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आज सकाळी सहा वाजताच शेतकरी जळोची येथील बारामती बाजार समितीच्या उपबाजारात दाखल झाले. त्यांनी लिलाव पुकारण्यास सुरवात करणाऱ्या व्यापाऱ्यांना आवाहन करीत लिलाव बंद ठेवण्याची सूचना केली. त्याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. काही ठिकाणी तरीही लिलाव सुरू झाल्याचे समजताच आक्रमक शेतकऱ्यांनी हे लिलाव बंद पाडले. 

विशेष म्हणजे या आंदोलनात सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते एकत्र आले होते. छत्रपती कारखान्याचे संचालक संतोष ढवाण, राजेंद्र गावडे, बाजार समितीचे सभापती रमेश गोफणे, संचालक सुनील पवार, प्रताप सातव, सचिव अरविंद जगताप, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमोल काटे, नगरसेवक सुधीर पानसरे, शिवसेनेचे सतीश काटे, राष्ट्रवादीचे जितेंद्र काटे, शीतल काटे, बारामती फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद वरे, अविनाश काळकुटे, विजयसिंह बाबर आदींसह काही सरपंच व शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Web Title: pune news baramati news farmers strike agri market yard auction shut