"उद्याच्या चिंतेमध्ये आजचा सुखाचा दिवस व्यर्थ घालवू नका"

मिलिंद संगई
सोमवार, 31 जुलै 2017

तुझे काहीच नाही....
सगळे माझे आहे हे म्हणणे हे व्यावहारिक सत्य आहे, पण तुझ्यानंतर तु काहीही घेऊन जाऊ शकत नाही जे आहे ते सगळे इतरांचेच होते हे वास्तविक सत्य आहे आणि ही वास्तविकता कधीही नजरेआड करु नका असा संदेश महाराजांनी दिला. 

बारामती : जीवन जगताना आज प्रत्येक मनुष्य धावतो आहे, जीवघेण्या स्पर्धेत सगळी भौतिक सुखे प्राप्त होत आहेत, पण मानसिक शांतता काही मिळत नाही. उद्याच्या चिंतेमध्ये आजचा सुखाचा दिवस व्यर्थ घालवू नका, आहे त्यात समाधान मानायला शिकाल तरच जीवन सुखी होईल, असा संदेश प.पू. 108 आचार्य पुलकसागरजी महाराजांनी आज दिला. 

बारामतीतील श्री दिगंबर जैन समाजबांधवांच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित ज्ञानगंगा महोत्सवातील आजचे दुसरे व्याख्यानपुष्प आम्ही उद्याची चिंता करीत नाही, या विषयावर महाराजांनी आज गुंफले. जीवन जगण्यासाठी प्रत्येकाचीच आज जीवघेणी स्पर्धा सुरु आहे, जो तो पुढील माणसाच्या पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतो आहे, जे आपल्याकडे आहे त्याकडे दुर्लक्ष करीत जे आपल्याकडे नाही, त्याच्या मागे लागून मनःशांती, सुख समाधानही घालवून बसत आहे. दुर्देव हेच आहे की आम्ही धावतो तर आहोत पण आमचे ध्येय काय याची कोणालाच कल्पना नाही. 

माझे ते माझे आणि शेजा-याचेही माझे ही भावना मनात लोभ निर्माण करते, मनाचे समाधानच होत नसल्याने आणखी काहीतरी मिळविण्यासाठी माणूस धावत राहतो आणि हातातील सुखही गमावून बसतो, अशी आजची स्थिती असल्याचे महाराजांनी नमूद केले. एखादा भिकारी तुमच्याकडे काहीतरी मागण्यासाठी येतो तेव्हा तुम्ही तुमच्याकडे काहीच नाही असे सांगता, ज्याच्याकडे सगळे असून एखाद्या असहाय माणसाला मदत करु शकत नसेल तर तोच ख-या अर्थाने भिकारी म्हणावा लागेल, असे ते म्हणाले. 

तिन्ही लोकांची संपत्ती जरी मनुष्याला दिली तरी त्याचे मनच भरत नाही, कितीही पैसा मिळाला तरी मन भरत नाही आणि दुःखाच्या मागे मन धावत राहते, आहे यात समाधान मानले तर मनःशांती प्राप्त होईल, असा संदेश त्यांनी दिला. ज्या दिवशी मनातील लोभ संपेल त्याच दिवशी ख-या अर्थाने सुखप्राप्ती होईल असे ते म्हणाले. उद्याची चिंता करत बसू नका, चिता ही मृत्यूनंतर माणसाला जाळते पण चिंता मात्र जिवंतपणी मरणप्राय यातना देत राहते, त्या मुळे फार चिंता करणे सोडून द्या, असा सल्ला त्यांनी दिला. 

 

Web Title: pune news baramati news jain guru pulak sagarji spiritual