बारामतीत 'पाऊले चालती पंढरीची वाट' या शिल्पसमूहाचे उदघाटन

मिलिंद संगई
बुधवार, 21 जून 2017

वारीमार्गावरील एक गाव म्हणूनही बारामतीची सर्वांना ओळख राहावी या उद्देशाने या शिल्पसमूहाची नगरपालिकेच्या वतीने उभारणी करण्यात आली आहे. 

बारामती : शहराच्या सौंदर्यात भर घालणा-या व जवळपास 20 लाख रूपये खर्चून उभारण्यात आलेल्या पाऊले चालती पंढरीची वाट या शिल्पसमूहाचे उदघाटन मंगळवारी (ता. 20) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. जवळपास सव्वा कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सुसज्ज व अद्ययावत अग्निशामन केंद्राचेही अजित पवार यांनी उदघाटन केले. हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पुणे शहरानंतरचे सर्वात मोठे गाव म्हणून बारामतीचा उल्लेख होतो. बारामतीला वारीची अनेक वर्षांची वैभवशाली परंपरा आहे, हजारो वारकरी वारीच्या निमित्ताने वर्षातून एक दिवस का होईना बारामतीमार्गे पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात, या वारीमार्गावरील एक गाव म्हणूनही बारामतीची सर्वांना ओळख राहावी या उद्देशाने या शिल्पसमूहाची नगरपालिकेच्या वतीने उभारणी करण्यात आली आहे. 

बारामतीची वाढती लोकसंख्या व नगरपालिकेची वाढलेली हद्द विचारात घेता अत्याधुनिक अग्निशामन केंद्र ही बारामतीची गरज होती. अजित पवार यांनीच अर्थमंत्री असताना या साठी निधी उपलब्ध करुन दिला होता. या नवीन केंद्रामुळे बारामतीकरांना तातडीने अग्निशामक दलाच गाडी उपलब्ध वेळेत होईल. येथे कर्मचारी निवासाचीही सोय असल्याने तातडीच्या वेळेस जलद गतीने गाडी आग लागलेल्या ठिकाणी जाऊ शकेल. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष जय पाटील, मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी स्वागत केले.

Web Title: pune news baramati pandharpur wari sculptures