बारामती-फलटण रेल्वेमार्ग संपादनासाठी शेतकऱ्यांच्या सहकार्याची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

नवीन दरानुसार नुकसानभरपाई देणार
सन 2013 आणि 2015 मध्ये राज्य शासनाने दिलेल्या नवीन निर्देशानुसार बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याने ती रक्कम चांगली असेल असेही निकम यांनी स्पष्ट केले. या रेल्वेमार्गासाठी जमीन उपलब्ध झाल्यावर रेल्वेकडून लगेच कामाला प्रारंभ होऊ शकतो. सर्वांच्या संमतीने ही जमीन मिळविण्याचा शासनाचा प्रयत्न असून त्या दृष्टीने आम्ही सर्वांशी विचारविनिमय करीत असल्याचे ते म्हणाले. यातही बागायती व जिरायती अशा जमीनींना वेगळे दर मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

बारामती : प्रस्तावित बारामती फलटण रेल्वेमार्गासाठी भूसंपादनासाठी या भागातील शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास ही प्रक्रिया वेगाने पूर्ण होऊ शकेल, असे मत उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी व्यक्त केले. 

प्रस्तावित बारामती फलटण हा रेल्वेमार्ग बारामती तालुक्यातील तेरा गावातून जाणार आहे. साधारणपणे 37 कि.मी. लांबीचा हा रेल्वेमार्ग असेल. या रेल्वेमार्गासाठी 170 हेक्टर जमीनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. यात जवळपास दोन हजार लोक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बाधित होणार आहेत. या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून डिमार्केशन प्रक्रीयाही पूर्ण झाल्याचे निकम यांनी सांगितले. या बाबत आता कायदेशीर प्रक्रीया सुरु असल्याचे सांगून ते म्हणाले की या भूसंपादन प्रक्रीयेसाठी रेल्वेने सुमारे शंभर कोटी रुपये राज्य सरकारकडे वर्ग केलेले आहेत. 

नुकसानभरपाई त्वरित देणार
दरम्यान या रेल्वेमार्गात बाधित होणा-या शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई दिली जाणार आहे. ज्या दिवशी त्यांची जमीन सरकारच्या नावावर होईल त्याच दिवशी रक्कम देण्याची तरतूद करण्यात आली आहे. लाटे आणि माळवाडी या दोन गावातील शेतकऱ्यांनी जमीन संपादीत करण्याच्या प्रक्रीयेसाठी सहमती दर्शविली असून इतर गावातील शेतकऱ्यांनीही यात पुढे यावे, असे आवाहन निकम यांनी केले. 

नवीन मार्ग रेल्वेसाठी उपयुक्त
सध्या दौंड-कुर्डुवाडी- मिरज असा रेल्वे मार्ग वापरला जातो, मात्र त्या ऐवजी दौंड-बारामती-फलटण-लोणंद- मिरज असा रेल्वेमार्ग अधिक जवळचा व फायदेशीर ठरेल असे रेल्वेचेच म्हणणे होते. यातही फलटण लोणंद या मार्गाचे काम पूर्ण झालेले असले तरी जो पर्यंत बारामती फलटण हा रेल्वेमार्ग पूर्ण होत नाही तो पर्यंत दक्षिण भारतात जाण्यासाठी जवळचा रेल्वेमार्ग तयार होत नसल्याने आता रेल्वेने बारामती फलटण रेल्वेमार्गावर लक्ष केंद्रीत केले आहे. बारामती फलटण लोणंद हा 65 कि.मी. लांबीचा रेल्वेमार्ग टाकण्यासाठी सन 2002 मध्ये 138 कोटी 48 लाखांचा खर्च अपेक्षित होता. त्या पैकी 30 कोटी रुपये खर्चून फलटण लोणंद मार्ग तयारही झाला. आता बारामती फलटण मार्गासाठी भूसंपादन प्रक्रीया सुरु झाली आहे. 

Web Title: pune news baramati phaltan railway acquisition appeal