ब्रेक टेस्ट घेताना टेम्पोचे कॅबिन उलटले; RTO अधिकारी जखमी

चिंतामणी क्षीरसागर
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

सहायक वाहन निरीक्षक अभिजित तरकसे वाहन चालवून ब्रेक टेस्ट करीत होते. यामध्ये सुमारे ४० च्या वेगाने वाहन चालवून अचानक ब्रेक दाबून वाहन जागेवर थांबते का याची पहाणी होत असते.

वडगाव निंबाळकर : प्रादेशिक परिवहन विभागाकडून पासिंग करून घेण्यासाठी आलेल्या मालवाहतूक वाहनाची ब्रेक टेस्ट घेताना वाहनाची कॅबिन उलटून अपघात झाल्याची घटना आज (रविवार, ता. २९) दुपारी बारामती येथे घडली. यामध्ये वाहन चालवणारे सहायक मोटार वाहन निरीक्षक (आरटीओ) अभिजित तरकसे किरकोळ जखमी झाले आहेत.

पासिंगची वाहने रखडल्याने रविवारी कामकाज चालू ठेवून वाहने पासिंग करून त्यांना योग्यता प्रमाणपत्रं द्यावीत असे आदेश बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिलकुमार वळीव यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार आज रविवारी मालवाहतूक वाहनांची ब्रेक टेस्ट येथील एमआयडीसी कटफळ मार्गावर चालू होती. मोटार वाहन निरीक्षक संपत खोमणे कागदपत्रांची तपासणी करीत होते.

सहायक वाहन निरीक्षक अभिजित तरकसे वाहन चालवून ब्रेक टेस्ट करीत होते. यामध्ये सुमारे ४० च्या वेगाने वाहन चालवून अचानक ब्रेक दाबून वाहन जागेवर थांबते का याची पहाणी होत असते.

सोनाई दूध डेअरीचा टाटा कंपनीचा एमएच ४२ बी ९०६२ दुध वाहतुकीचा मोठा टेम्पो आरटीओ तरकसे ब्रेक टेस्टसाठी चालवीत होते. वेग घेउन ब्रेक दाबताच वाहनाची पुढची बाजु (कॅबीन) पलटली झाली. वाहनाची पुढची बाजु पलटी होउनही ब्रेक टेस्ट घेणारे आरटीओ तरकसे यांच्याकडुन वाहनाचा ताबा सुटला नाही. ब्रेकवरचा पाय काढला नसल्याने वाहन जागेवर थांबले. पुढची काचही यावेळी फुटली नाही. यामुळे मोठा अनार्थ टळला पुढे पन्नास मिटरवर वळन होते. आरटीओ कार्यालयाकडे सद्या टेस्ट घेण्यासाठी स्वतःची जागा नसल्याने सार्वजनिक मार्गावर टेस्ट घेतल्या जात आहेत. ब्रेक मारताना मागून वाहन आल्यास मोठा अपघात घडू शकतो. धोकादायक पद्धतीने चालू असलेल्या टेस्टबाबत विचार व्हावा अशा प्रतिक्रीया वाहन मालकांमधून येत आहेत.

Web Title: pune news baramati rto face accident in break test