शिर्सुफळ आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप

संतोष आटोळे
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातुन श्‍वानदंश लस, सर्पदंश लस उपलब्ध आहे. प्रत्येक ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग, अंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, प्रसृतीगृह, लसीकरण विभाग अद्ययावत आहेत.

शिर्सुफळ : शिर्सुफळ (ता. बारामती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियमित डाॅक्टर नसणे. तसेच इतर कर्मचारीही कामकाजात हलगर्जीपणा करीत असल्यामुळे शासकीय आरोग्य सुविधा मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असतानाही सर्वसामान्य रुग्णांना वेळेवर आरोग्यसेवा मिळत नाहीत. तसेच याबाबत अनेक वेळा संबंधितांकडे लेखी तसेच तोंडी तक्रार करुनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे आज (ता. 22) रोजी सरपंच अतुल हिवरकर यांच्यासह ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. यामुळे शिर्सुफळ आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.

शिर्सुफळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शिर्सुफळ मुख्य केंद्रासह पारवडी, कटफळ, सिध्देश्वर निंबोडी, सावळ, तांदुळवाडी, उंडवडी क.प., उंडवडी सुपे, बऱ्हाणपूर, आठ उपकेंद्राच्या माध्यमातून सुमारे 40 गावामधील हजारो रुग्णांना वैद्यकिय सुविधा पुरविल्या जातात यासाठी दोन वैद्यकिय अधिकारी पदे मंजुर आहेत. मात्र 1 एप्रिल 2017 पासून या ठिकाणी नियमित कार्यरत वैद्यकिय अधिकाऱ्यांची नेमणुक केली गेलेली नाही. दुसरीकडे नेमणुक असलेल्या डाँक्टरांना अतिरिक्त भार देवुन आरोग्य केंद्र चालविले जात आहे. मात्र तेही उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातुन श्‍वानदंश लस, सर्पदंश लस उपलब्ध आहे. प्रत्येक ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग, अंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, प्रसृतीगृह, लसीकरण विभाग अद्ययावत आहेत. या आरोग्य केंद्रातून मलेरिया, डेंग्यू, संसर्गजन्य रोग, कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ, विषमज्वर व इतरही अनेक प्रकारच्या रोगावर लसीकरण, उपचार केले जातात. यासाठी सर्व सोयी सुविधा असताना प्रत्येकक्षात वैद्यकिय अधिकाऱ्या अभावी आरोग्य सेवाच सलाईनवर आहे यामुळे रुग्णांची मात्र गैरसोय व हेळसांड होत आहे.

दरम्यान आज (ता. 22) रोजी कार्यालयीन वेळेत सरपंच अतुल हिवरकर यांच्यासह ग्रामस्थांनी रुग्णालयाची पाहणी केली यावेळी वैद्यकिय अधिकारी तर नव्हतेच याबरोबरच तीन आरोग्य सेविकांची नेमणुक असताना एकही हजर नव्हत्या. कतसेच क्लार्कही उपस्थित नव्हते. सर्वत्र अस्वच्छता होती. यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी उपस्थित कर्मचाऱ्यांच्या सहीसह निवेदन घेत आरोग्य केंद्राला कुलुप ठोकले. व जोपर्यंत याबाबत ठोस निर्णय होत नाही. तोपर्यंत कुलुप न उघडण्याचा तसेच जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पोपट मेरगळ, साबळेवाडीचे माजी सरपंच अशोक भगत, मच्छिंद्र बनकर, बापुराव झगडे, गणेश शिंदे, अमोल शिंदे, राजेंद्र हिवरकर, संजय माळवे, संतोष सातपुते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

अनेक वेळा तक्रारी करुनही कार्यवाही नाही... म्हणून कुलूप लावण्याची वेळ
याबाबत बोलताना सरपंच अतुल हिवरकर म्हणाले, एकीकडे नियमित वैद्यकिय अधिकारी उपलब्ध करुन देण्यास प्रशासन असमर्थ असताना नेमणुक असलेल्या आरोग्य सेविकाही नियमित उपस्थित राहत नाहीत. तर एक सेविका शिर्सुफळ येथे नेमणुक असतानाही दुसरीकडे काम करीत आहे. यामुळे शिर्सुफळ प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकिय अधिकाऱ्यांसह परिचारीकाही उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news baramati shirsufal health center sealed