बाजार समित्यांच्या निवडणुका बोटांच्या ठशांवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

सहकारी संस्थांसह बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये प्रथमच इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनसह "थंब इम्प्रेशन'चा वापर करण्याच्या शिफारशीला मंजुरी देण्यात आली आहे. आगामी कॅबिनेट बैठकीत त्याला अंतिम मंजुरी दिली जाईल. 
- सुभाष देशमुख, सहकारमंत्री 

पुणे - राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये मुदत संपूनदेखील निवडणुका झालेल्या नाहीत. यंदाच्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. मतदार याद्यांना आधारजोडणी करून बनावट मतदार टाळण्यासाठी "थंब इम्प्रेशन'द्वारे मतदान करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. 

राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाकडून कृषी बाजार उत्पन्न समित्यांच्या निवडणुकांची नियमावली तयार करून अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. त्या प्रस्तावाला सहकार खात्याची मंजुरी मिळाली असून, कॅबिनेट मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. 

या संदर्भात राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी म्हणाले, "निवडणूक प्राधिकरणाकडून आगामी काळात होणाऱ्या संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये गृहनिर्माण संस्था, सहकारी साखर कारखान्यांमधील निवडणुका आहेत. ज्या बाजार समित्यांच्या मुदती संपल्या आहेत, त्यांना सध्या सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या निवडणुकीत बनावट मतदारांवर आळा घालण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनसह थंब इम्प्रेशनची शिफारस राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.' 

Web Title: pune news Bazar Samiti election