नाटकांच्या प्रेक्षकांची ‘उपासमार’ होतेय - भालचंद्र कुलकर्णी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

पुणे - ‘‘नाटकाचे एका माणसाचे तिकीट पाचशे रुपयांना मिळत असेल, तर प्रेक्षक सहकुटुंब नाटकाला कसे येणार? पण वाढत्या खर्चानुसार तिकीटवाढ योग्यच आहे, असे नाट्यव्यवस्थापक सांगत आहेत. ही कोंडी फुटली पाहिजे.

पुणे - ‘‘नाटकाचे एका माणसाचे तिकीट पाचशे रुपयांना मिळत असेल, तर प्रेक्षक सहकुटुंब नाटकाला कसे येणार? पण वाढत्या खर्चानुसार तिकीटवाढ योग्यच आहे, असे नाट्यव्यवस्थापक सांगत आहेत. ही कोंडी फुटली पाहिजे.

कारण यात प्रेक्षकांचे हाल होत आहेत. त्यांची ‘उपासमार’ होत आहे,’’ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी खंत व्यक्त केली. महाराष्ट्र हा नाट्यवेडा आहे. नाटक पाहणे ही प्रेक्षकांची ‘भूक’ आहे, असेही ते म्हणाले.
नाट्य परिषदेच्या वर्धापन दिन सोहळ्यात ‘नटवर्य केशवराव दाते स्मृती पुरस्कार’ अभिनेते डॉ. राम साठ्ये, ‘मधुकर टिल्लू एकपात्री कलाकार पुरस्कार’ डॉ. विश्‍वास मेहेंदळे, ‘भार्गवराव आचरेकर स्मृती पुरस्कार’ मधू गायकवाड, ‘माणिक वर्मा पुरस्कार’ अशोक काळे यांना कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान केला. कुलकर्णी म्हणाले, ‘‘लोककला ही सर्व कलांचे मूळ आहे; पण ही लोककला सध्या कुठे आहे? लोककलावंतांची अत्यंत वाईट अवस्था आहे. त्यांना व्यासपीठ मिळत नाही. सरकारचे मानधनही वेळेवर मिळत नाही. असे अनेक प्रश्‍न भेडसावत आहेत. दुसरीकडे ज्यांचे नाव झाले आहे असे कलावंत खेड्याकडे पाठ फिरवतात. नाट्य संमेलनसुद्धा ग्रामीण भागात होत नाही. त्यामुळे तिथले ‘टायलेंट’ पुढे कसे येणार? याचाही विचार झाला पाहिजे.’’ 

दरम्यान, चंद्रकांत काळे, दीपक रेगे, सिद्धेश्‍वर झाडबुके, श्रद्धा सबनीस, वीरेंद्र विसाळ, संतोष पवार, चैतन्य देशमुख, सुरेंद्र गोखले, प्रतिमा काळेले, नंदकुमार भांडवलकर, आशुतोष वाडेकर, पराग चौधरी, राजेश बारबोले, डॉ. संजीवकुमार पाटील, आशुतोष पोतदार, रवी पाटील, जयदीप मुजुमदार, सुबोध पंडे, शर्वरी जाधव यांच्यासह ‘प्रयोग, पुणे’ या संस्थेलाही पुरस्काराने गौरविण्यात आले. परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, सुरेश देशमुख, दादा पासलकर, अविनाश देशमुख, मेघराज राजेभोसले, निकिता मोघे, मकरंद टिल्लू उपस्थित होते.

समाजाला डॉक्‍टर, अभियंते, वकील यांची जशी आवश्‍यकता आहे, तशी चांगल्या अभिनेत्यांचीही आवश्‍यकता आहे. त्यामुळे अभिनय हा विषय शाळा-महाविद्यालयांत शिकवला गेला पाहिजे.
- भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते

Web Title: pune news bhalchandra kulkarni talking about drama