एसटी नोकरभरतीमध्ये प्रशासनाकडून गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

भोसरी - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोकण विभागासाठी वाहक तथा चालकपदांच्या भरतीसाठी महामंडळाद्वारे चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महिलांचे अवजड वाहन चालविण्याचा परवाना नसल्याच्या कारणाने अर्ज बाद करण्यात आले, त्यामुळे अवजड वाहनाचा परवाना नसतानाही चाचणी का घेतली, असा सवाल करत महिला उमेदवारांनी काही वेळ रास्ता रोको आंदोलन केले. मात्र, ऑन लाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया बाह्यसंस्थेद्वारे पूर्ण करण्यात आल्याने अटीची पूर्तता नसलेल्यांनाही चाचणी परीक्षेचे हॉल तिकीट गेल्याची शक्‍यता महामंडळाद्वारे वर्तविण्यात आली. 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोकण विभागासाठी वाहक तथा चालक पदांच्या भरतीसाठी १२ जानेवारी २०१७ रोजी निवेदन प्रसिद्ध करण्यात आले होते. या जागांसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून महिला, तसेच पुरुष उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. मात्र, ऑनलाइन अर्जांची पुनर्तपासणी न करता ज्या महिलांकडे अवजड वाहन परवाना नाही, अशांचीही जुलै महिन्यात चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीतील उत्तीर्णांना कागदपत्रांच्या तपासणीसाठी भोसरीतील महामंडळाच्या मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेत बोलावण्यात आले होते. या ठिकाणी नांदेड, औरंगाबाद, नाशिक, गोंदिया, जळगाव, मुंबई, वर्धा, सोलापूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांसह इतर राज्यांतील महिलाही रविवारीच (ता. १०) आल्या होत्या. आज सकाळी कागदपत्रांच्या तपासणीत अवजड वाहनचालक परवाना नसल्याचे कारण देत त्यांचे अर्ज बाद करण्यात आले. त्यामुळे महिला उमेदवारांनी संताप व्यक्त करत रास्ता रोको केले. रास्ता रोको थांबविण्यासाठी महामंडळाद्वारे पोलिसांना पाचारण करावे लागले.

औरंगाबामधील वनिता मोरे यांच्याकडे अवजड वाहनचालक परवाना आणि अनुभव असताना उंची कमी असल्याचे, तर यवतमाळमधील वर्षा शिडामकडे अनुभव नसल्याचे कारण देत त्यांचे अर्ज बाद करण्यात आले. अवजड वाहने महिलांना चालविण्यास दिली जात नसल्याने बहुतांश महिलांकडे अवजड वाहनचालक परवान्याचा अभाव असल्याने वाहकपदासाठी इच्छुक असलेल्या महिला उमेदवारांसाठी महामंडळाद्वारे अवजड परवान्याची अट टाकून अन्याय केल्याचाही सूर महिला उमेदवारांमधून होता. 

चालक तथा वाहक या पदांसाठी भरती असताना वाहक परवानाधारक महिलांनी अर्ज केले होते. मात्र, त्यांच्याकडे अवजड वाहन परवाना नसल्याकारणाने बहुतेक महिला उमेदवारांचे अर्ज बाद झाले. अर्ज बाद झालेल्या महिला उमेदवारांनी दिलेल्या मागणीचे निवेदन पुढे पाठविण्यात येणार आहे. प्रशासन यावर जो निर्णय घेईल, त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल.
 - रमेश हांडे, विभागीय वाहतूक अधीक्षक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था, भोसरी

Web Title: pune news bhosari Maharashtra State Transport Corporation recruitment