अस्वस्थ पुणे भाजपवर निनावी पत्राचा 'बॉम्ब' !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

नेत्यांवर शेरेबाजी; पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
 

पुणे : वादांमुळे अस्वस्थ झालेल्या शहरातील भारतीय जनता पक्षावर निनावी लेटरचा "बॉम्ब' पडल्याचे रविवारी उघड झाले. पक्षातील अनेक नेत्यांवर शेरेबाजी करणाऱ्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचे पदाधिकाऱ्यांबद्दलचे उद्‌गार आणि त्याला स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिलेले प्रत्युत्तर यामुळे भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्यात सध्या अस्वस्थता आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या काही नगरसेवकांसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनाही गेल्या दोन दिवसांत घरपोच निनावी पत्र आले आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, मंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, शहरातील आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, विजय काळे, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, मेधा कुलकर्णी, तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्वीकृत नगरसेवक गोपाळ चिंतल आदींबद्दल पत्रात शेरेबाजी करण्यात आली आहे.

खासदार काकडे यांच्या समर्थकाने हे पत्र लिहिल्याचे त्यात भासवले गेले आहे. मात्र, या पत्राशी माझा अथवा माझ्याशी संबंधित कार्यकर्ते, नगरसेवकांचा संबंध नसल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले. याबाबत पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पत्रात नगरसेवकांच्या एका गटाला भाजपमध्ये समाधानकारक वागणूक मिळत नसल्याचे म्हटले आहे. हे पत्र दिल्लीवरून टपालाने पाठविण्यात आले आहे. पत्र निनावी असले, तरी त्यातील मजकुराबाबत शहरातील राजकीय वर्तुळात गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे.

Web Title: pune news bjp letter bomb