प्रकल्पांच्या कामातील अडथळे दूर करा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

पुणे - शहरात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची उभारणी सुरू असून, त्यांच्या अंमलबजावणीकरिता पुरेशी यंत्रणा नसल्याचे गाऱ्हाणे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नुकतेच घातले. विशेषत: प्रकल्पांच्या भूसंपादनातील अडथळे दूर करून ते वेळेत पूर्ण होतील, यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली. यावर पावसाळी अधिवेशनात नागपूरमध्ये बैठक घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. 

मुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी (ता. 26) पुण्यात आले होते. त्या वेळी महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी त्यांची भेट घेऊन पुण्याच्या प्रश्‍नांबाबत तातडीने बैठक घेण्याची मागणी केली. शहरात मेट्रोसह समान पाणीपुरवठा, चांदणी चौकातील उड्डाण पूल, स्मार्टसिटी, भामा आसखेड, पीएमपी बसखरेदी प्रक्रिया आदी कामे सुरू आहेत. त्यातील काही प्रकल्पांच्या अंमलबजावणीत अडथळे येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

प्रामुख्याने चांदणी चौकातील उड्डाण पूल उभारण्यात भूसंपादनाच्या अडचणी येत आहेत. यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. भामा आसखेड प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र स्थानिक शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम असल्याने भविष्यात ते काम रोखले जाण्याची शक्‍यता आहे. त्याबाबत तोडगा काढण्याची विनंतीही पदाधिकाऱ्यांनी केली. याशिवाय, कचरा प्रकल्प आणि त्यासाठीच्या जागांबाबतही चर्चा झाली. 

काही प्रकल्पांतील अडचणी दूर केल्यास त्यांना गती मिळेल. त्यासाठी पुढील महिन्यात नागूपरमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, सभागृहनेता आणि महापालिका आयुक्तांची बैठक होणार आहे. 
- श्रीनाथ भिमाले, सभागृहनेते, महापालिका 

Web Title: pune news bjp PMC