अवयवदानाची चळवळ "सशक्त'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

पुणे - आधुनिक पुण्यात आता अवयवदानाची चळवळ रुजत असल्याचे आशादायक चित्र दिसत आहे. वैद्यकीय तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अवयवदानाबाबत समाजात होत असलेली जागृती. या सर्वांचा परिणाम म्हणून शहरात अवयवदानाचे प्रमाण वेगाने वाढत आहे.

पुणे - आधुनिक पुण्यात आता अवयवदानाची चळवळ रुजत असल्याचे आशादायक चित्र दिसत आहे. वैद्यकीय तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अवयवदानाबाबत समाजात होत असलेली जागृती. या सर्वांचा परिणाम म्हणून शहरात अवयवदानाचे प्रमाण वेगाने वाढत आहे.

पुण्यात 1997 मध्ये रुबी हॉल क्‍लिनिक येथे पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले. त्याआधी चार दिवस मुंबईमंध्ये महाराष्ट्रातील पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले होते; मात्र गेल्या वीस वर्षांमध्ये मुंबई राज्यातील अवयवदानात अव्वल ठरत होती. तेथील रुग्णालयांची मोठी संख्या, अद्ययावत वैद्यकीय उपकरणे, दळण-वळणाच्या सुविधा या निश्‍चितच मुंबईकडे जमेच्या बाजू होत्या. गेल्या दोन वर्षांमध्ये हे चित्र झपाट्याने बदलत आहे. आयटी हब ते स्मार्ट सिटीपर्यंतचा प्रवास त्याचे एक परिमाण आहे. पुण्यातही आता अवयव प्रत्यारोपणासाठी आवश्‍यक कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच अवयवदानासाठी आणि प्रत्यारोपणासाठी अत्यावश्‍यक अद्ययावत वैद्यकीय उपकरणे, पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. वीस वर्षांमध्ये विमान सेवेचाही विस्तार झाला आहे. त्यामुळे पुण्यात गेल्या दोन वर्षांमध्ये अवयवदानाच्या चळवळीने मूळ धरले आहे, असे 'इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर'चे (आयएससीसीएम) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कपिल झिरपे यांनी सांगितले.

"आयएससीसीएम'च्या पुणे शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (ता. 9) अवयवदान जनजागृतीसाठी "रिटर्न गिफ्ट' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने बोलताना डॉ. झिरपे म्हणाले, 'अवयवदानाबद्दलची जागृती ही फक्त डॉक्‍टरांपुरती मर्यादित न राहता ती शहर आणि परिसरातील सामान्य लोकांपर्यंत होत आहे. त्यामुळे दान केलेल्या अवयवातून एखाद्या गरजू रुग्णाचा प्राण वाचतो, याची जाणीव आता होऊ लागली आहे.''

अशी झाली चळवळ सशक्त
रुग्णाच्या मेंदूचे कार्य थांबल्यानंतर त्याचे दान करण्यायोग्य अवयव कार्यक्षम ठेवण्याचे मोठे आव्हान वैद्यकीय तज्ज्ञांपुढे असते. त्यासाठी अद्ययावत वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित डॉक्‍टर महत्त्वाचे ठरतात. शहरातील प्रमुख रुग्णालयांमधून ही संख्या वाढत आहे. त्यातून अवयवदानाची चळवळ वाढीस लागली आहे.

हवा सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर
राज्यात मुंबईखालोखाल पुण्यात वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण झाले आहे; मात्र त्याचा पूर्ण क्षमतेने वापर झाला पाहिजे. गेल्या तीन वर्षांमध्ये जेमतेम हृदय आणि फक्त एक फुफ्फुस दान केले आहे. ही संख्या वाढविण्याची प्रचंड क्षमता आणि सुविधा आपल्याकडे आहे.

नातेवाइकांची अवयवदानाला मान्यता
शहरात गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या जागृतीमुळे रुग्णाच्या ब्रेन डेडनंतर त्याचे अवयवदान करण्यास मान्यता देणाऱ्या नातेवाइकांची संख्या वाढत आहे. 2013मध्ये अवयवदानाबाबत विचारलेल्यांपैकी 32 टक्के नातेवाइकांनी परवानगी दिली होती. हे प्रमाण आता 59 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे.

अवयवांची गरज असलेल्या रुग्णांची प्रतीक्षा यादी मोठी आहे. त्यातुलनेत दात्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे 59 टक्के रुग्णांचे नातेवाईक अवयवदानाला तयार होत असले, तरीही 41 टक्के नातेवाईक यासाठी पुढे का येत नाहीत, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. तसेच एकाच अवयवाचे दान करण्यापेक्षा रुग्णांचे सर्व चांगले अवयवदान करण्याचा पुढचा टप्पा चळवळीने आता गाठला पाहिजे.
- डॉ. कपिल झिरपे

Web Title: pune news body part donate response