प्रतिकूल परिस्थितीशी झगडणारा मुष्टियोद्धा

प्रतिकूल परिस्थितीशी झगडणारा मुष्टियोद्धा

मातोश्री रमाबाई आंबेडकर वस्तीमधील (ताडीवाला रस्ता) एका छोट्याशा झोपडीत राहणारा अभिमान ऊर्फ अभिमन्यू सूर्यवंशी. इतरांप्रमाणेच त्याच्या कुटुंबालाही पोटाची भ्रांत होती. अशा परिस्थितीतही अभिमानला मुष्टियोद्धा (बॉक्‍सर) व्हायचे होते. पैसे, शिक्षण आणि खेळाचे गणित आयुष्यभर जुळलेच नाही. प्रशिक्षण, कष्ट असूनही केवळ पैशांअभावी व दुखापतीमुळे अनेक स्पर्धा अंतिम फेरीत गमवाव्या लागल्या. काही राष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धांमध्ये त्याने ‘सुवर्णपदक’ही मिळविले. दिवसा कॉलेज, बॉक्‍सिंग प्रशिक्षण तर रात्री सुरक्षारक्षकाचे काम, अशी जगण्याची ही लढाई आजही सुरू आहे. त्यातही तो वस्त्यांमधील मुलांना बॉक्‍सिंगचे धडे देत आहे, याबरोबरच पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमध्येही ‘बॉक्‍सर’ घडविण्याचे काम करत आहे.

पुणे रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या ‘प्रायव्हेट रोड’वरील लिंबोनी नगरमधील एका छोट्या घरात अभिमान आपल्या पाच-सहा सदस्यांबरोबर राहत आहे. आई-वडील कामासाठी पुण्यात आले. घर नसल्यामुळे नातेवाइकांकडे राहावे लागत होते. अनेकदा त्यांच्याकडून जेवण दिले जात नसे. अखेर त्याच्या वडिलांना एका कंपनीत काम मिळाले. आईही परिसरातील सोसायट्यात घरकाम करू लागली. त्यामुळे काही दिवसातच एक छोटीशी झोपडी भाड्याने घेऊन त्यामध्ये हे कुटुंब राहू लागले. त्याच वेळी त्यांनी मुलांना शिक्षणासाठीही प्रोत्साहन दिले. अभिमान महात्मा ज्योतिबा फुले शाळेत शिकत होता. या शाळेमधील स्पोर्टस ॲकॅडमीमध्ये नामवंत मुष्टियोद्धा सिलोन ॲन्ड्रुज व आबा गायकवाड हे वस्तीतील मुलांना व्यायाम व बॉक्‍सिंगची गोडी लागावी, यासाठी धडपड करत होते. अभिमानने त्यांच्याकडे शिकायला सुरवात केली. त्यामध्ये अभिमानची रुची वाढू लागली.

वडील व आई दोघेही कष्टकरी. कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना त्यांना अवघड जात होते. हलाखीच्या परिस्थितीमुळे ते अभिमानला प्रोत्साहन देऊ शकत होते. मात्र, पैसे देणे त्यांना शक्‍य नव्हते. पुण्यात १९९२ मध्ये झालेल्या ‘महाराष्ट्र स्टेट ओपन बॉक्‍सिंग चॅम्पियनशिप’ व ‘वेस्टर्न इंडिया बॉक्‍सिंग चॅम्पियनशिप’मध्ये अभिमानने सुवर्णपदक मिळविले. 

अभिमान म्हणाला, ‘‘दिल्ली येथील स्पर्धेसाठी १९९४ ला गेलो होतो. वडिलांनी कसेबसे १५० रुपये दिले. दहा दिवसांची स्पर्धा होती. अनेकदा उपाशी राहायचो. कसाबसा फायनलपर्यंत पोचलो. खिशात फक्त ३० रुपये होते. त्याचे गाजर घेतले, दोन दिवस त्यावर काढले. पोटात अन्न नसतानाही अंतिम फेरीत खेळलो. अखेर रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.’’ 

आंतरराष्ट्रीय बॉक्‍सर होण्याची अभिमानची इच्छा होती. त्यासाठी चांगले प्रशिक्षण, कष्टही तो घेत होता, मात्र पैशांच्या चणचणीमुळे राज्याबाहेरील आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा त्याला खेळता आल्या नाहीत. महाराष्ट्रासह गोव्यातील स्पर्धांमध्ये त्याने सुवर्णपदक मिळविले. पैशांमुळे पुढे जाता येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने वस्त्यांमधील मुलांना मोफत बॉक्‍सिंगचे धडे देण्यास सुरवात केली. एकीकडे कॉलेज, दिवसा प्रशिक्षण देणे आणि रात्री सुरक्षारक्षक म्हणून  काम करण्याची त्याची लढाई सुरू होती.  त्यातच पुणे विद्यापीठाच्या खेळाडूंना बॉक्‍सिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी स्पर्धेनुसार मानधन तत्त्वावर त्याची निवड झाली. दरम्यान, प्रशिक्षक होण्यासाठी आवश्‍यक ‘नेताजी सुभाषचंद्र बोस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस’ची परीक्षा देणे आवश्‍यक होते. पुणे जिल्हा बॉक्‍सिंग संघटनेचे प्रकाश रेणुसे, वडील व मित्राने दिलेल्या आर्थिक पाठिंब्यावर अभिमानने तीही परीक्षा उत्तीर्ण केली. आता विद्यापीठातील खेळाडूंसह ‘एसएसपीएमएस’च्या खेळाडूंनाही अभिमान बॉक्‍सिंगचे प्रशिक्षण देत आहे. आजही अभिमानचा संघर्ष सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com