राज्यातील फिरत्या पुस्तक प्रदर्शनांना ‘ब्रेक’

सुशांत सांगवे
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

पुणे - अधिकाधिक वाचकांपर्यंत पुस्तके पोचवावीत आणि वाचनसंस्कृती वाढावी म्हणून सुरू झालेल्या फिरत्या पुस्तक प्रदर्शनांना ‘नोटाबंदी’ आणि ‘जीएसटी’चा फटका बसला आहे. पुस्तक विक्रीतून मिळणाऱ्या फायद्याचे सोडा; पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्याचा खर्चही वसूल होईना. त्यामुळे पुस्तक वितरकांनी फिरते प्रदर्शन आयोजित करणे जवळ जवळ नव्वद टक्‍क्‍यांनी कमी केले आहे, अशी आश्‍चर्यकारक माहिती समोर आली आहे.

पुणे - अधिकाधिक वाचकांपर्यंत पुस्तके पोचवावीत आणि वाचनसंस्कृती वाढावी म्हणून सुरू झालेल्या फिरत्या पुस्तक प्रदर्शनांना ‘नोटाबंदी’ आणि ‘जीएसटी’चा फटका बसला आहे. पुस्तक विक्रीतून मिळणाऱ्या फायद्याचे सोडा; पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्याचा खर्चही वसूल होईना. त्यामुळे पुस्तक वितरकांनी फिरते प्रदर्शन आयोजित करणे जवळ जवळ नव्वद टक्‍क्‍यांनी कमी केले आहे, अशी आश्‍चर्यकारक माहिती समोर आली आहे.

पुण्यातील पुस्तक वितरक राज्याच्या वेगवेगळ्या भागात जाऊन फिरते पुस्तक प्रदर्शन आयोजित करतात. त्यामुळे ठिकठिकाणच्या वाचकांना पुस्तके सहज मिळू लागली. हवे ते पुस्तके मिळण्याचे ठिकाण म्हणून या प्रदर्शनांची ओळखही बनली; पण नोटाबंदी, जीएसटी या निर्णयामुळे वाचकांनी पुस्तक प्रदर्शनांकडे पाठ फिरवली आहे. याचा फटका या व्यवसायाला बसला असून, अद्याप तो सावरलेला नाही. त्यामुळे बहुतांश वितरकांनी पुस्तक प्रदर्शन आयोजित करणे बंद केले आहे.

ग्रामीण भागापर्यंत पुस्तके घेऊन जाण्यात ‘अक्षरधारा’चा मोठा वाटा आहे. ‘अक्षरधारा’चे संचालक रमेश राठीवडेकर म्हणाले, ‘‘सभागृह भाडे, गाडी भाडे, कर्मचाऱ्यांचा मुक्काम-जेवण, जाहिराती असा खर्च करूनही वाचक पुस्तक खरेदीसाठी येत नाहीत. कारण तेच अद्याप नोटाबंदी आणि ‘जीएसटी’तून सावरले नाहीत. या दोन्ही निर्णयांचा आमच्या व्यवसायावर अप्रत्यक्ष परिणाम झाला आहे. 

त्यामुळे पुण्याबाहेर आयोजित केली जाणारी प्रदर्शने आम्ही पूर्णपणे थांबवली आहेत.’’ ‘शुभम साहित्य’चे राजू ओंबासे यांनीही हाच मुद्दा अधोरेखित केला. पुस्तक प्रदर्शनांमधून ४० ते ५० हजार रुपये उभे राहत होते. आता १० ते १२ हजार रुपये मिळतात. यातून प्रदर्शनाचा खर्चही भागवता येत नाही. त्यामुळे परभणी, नांदेड, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर अशा वेगवेगळ्या भागांतील पुस्तके प्रदर्शने आम्हाला बंद करावी लागली, असे ओंबासे यांनी सांगितले.

पुण्यातील प्रदर्शनांवरही परिणाम
‘‘वाचकांचा पूर्वीसारखा प्रतिसाद नाही, याची आम्हाला वारंवार खात्री होत आहे; पण इतके वर्षे या व्यवसायात घालविल्यानंतर हा व्यवसाय बंद करून दुसरा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा नाही,’’ अशा भावना ‘साहित्य दर्शन’चे गणेश लोंढे यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील पुस्तक प्रदर्शनांवर जसा परिणाम झाला आहे, तसाच पुण्यातील प्रदर्शनांवरही झाला आहे. पुण्यातील पुस्तक प्रदर्शन ५० टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत, असे ‘अक्षरधारा’चे रमेश राठीवडेकर यांनी सांगितले.

Web Title: pune news 'Break' for touring book exhibitions in the state