घरफोडी करणारी टोळी अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

पुणे - शहरातील वेगवेगळ्या भागांतील बंगल्यांची पाहणी करून घरफोडी करणाऱ्या मुंबईतील टोळीस अलंकार पोलिसांनी पकडले. यामध्ये तीन महिलांसह एक चोरटा आणि त्यांच्याकडून सोने विकत घेणारा अशा पाच जणांचा समावेश आहे. त्यांच्याकडून 14 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. 

पुणे - शहरातील वेगवेगळ्या भागांतील बंगल्यांची पाहणी करून घरफोडी करणाऱ्या मुंबईतील टोळीस अलंकार पोलिसांनी पकडले. यामध्ये तीन महिलांसह एक चोरटा आणि त्यांच्याकडून सोने विकत घेणारा अशा पाच जणांचा समावेश आहे. त्यांच्याकडून 14 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. 

अनू पवन आव्हाड (वय 25, रा. खराडी), पूजा प्रकाश आव्हाड (वय 38), अनिता कैलास बोर्डे (वय 42, रा. ठाणे), प्रकाश अंबादास आव्हाड (वय 34, सर्व रा. दिवा, ठाणे), चोरीचा माल विकत घेणारा मुबारक उमर खान (वय 41, रा. मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबरोबरच दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून सोन्याचे दागिने, लगड, चांदी, असा 14 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. 

एरंडवणा परिसरात एक महिला संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती अलंकार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. त्या वेळी तिच्यासह अन्य साथीदार शहरात घरफोडी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी अन्य आरोपींना अटक केली. या टोळीने अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत 5, डेक्कनमध्ये दोन, शिवाजीनगर येथे एक आणि मुंबई एक, अशा नऊ घरफोड्या केल्याची माहिती मिळाली आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त बसवराज तेली, सहायक पोलिस आयुक्त बाजीराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेखा साळुंखे, विजयकुमार शिंदे, संदीप बुवा, अंबरीश देशमुख, राजेंद्र लांडगे, राजेंद्र सोनवणे, नितीन कांबळे, उस्मान कल्याणी, बाबुलाल तांदळे, श्रीकांत चव्हाण, योगेश बडगे, तानाजी शेगर यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

आणखी दोन चोरट्यांना अटक 
अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोड्या करणाऱ्या रोहित दीपक सातपुते (वय 22, रा. हिंगणे), अक्षय शंकर कांबळे (वय 19, रा. भवानी पेठ) यांनाही पोलिसांनी अटक केली. 

चोरट्यांकडून बंगले लक्ष्य 
एरंडवणे, डेक्कन, कोथरूड, शिवाजीनर या भागांमधील बंगल्यांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात होते. भंगार गोळा करणे व पाणी पिण्याचा बहाणा करून महिला घरामध्ये प्रवेश करत. त्यानंतर घर बंद असल्याची खात्री झाल्यानंतर घराच्या पाठीमागील खिडकीचे बार वाकवून लहान मुलांना घरामध्ये सोडले जात. या मुलांकडून स्वयंपाकखोलीच्या दरवाजाची आतील कडी खोलल्यानंतर चोरटे घरात घुसून चोरी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: pune news burglary gang arrested