पूरक सर्टिफिकेट कोर्सेस उपयुक्त

मंगळवार, 25 जुलै 2017

पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतले तरी त्यातून बाजारपेठेला आवश्‍यक पूरक कौशल्ये आत्मसात होतातच असे नाही. म्हणून पदवी घेतल्यानंतरही वेगवेगळी कौशल्ये मिळवण्यासाठी अल्पमुदतीचे कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. त्यातून करिअरला चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात... 

पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतले तरी त्यातून बाजारपेठेला आवश्‍यक पूरक कौशल्ये आत्मसात होतातच असे नाही. म्हणून पदवी घेतल्यानंतरही वेगवेगळी कौशल्ये मिळवण्यासाठी अल्पमुदतीचे कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. त्यातून करिअरला चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात... 

वाणिज्यविषयक सर्टिफिकेट कोर्सेस 
एमकॉम करताना फायनान्स, अकाउंटिंग, मार्केटिंग इत्यादी विषयांचे चांगले ज्ञान मिळते. नंतर एखाद्या विशिष्ट क्षेत्रात करिअर करायचे असल्यास वेगवेगळे छोटे अभ्यासक्रम करता येतात. जसे, नॅशनल स्टॉक एक्‍सचेंज सर्टिफिकेट कोर्स इन फायनान्शियल मार्केट. यानंतर म्युच्युअल फंड, शेअर बाजारासंबंधी सल्लागार म्हणून काम करता येईल. मार्केटिंग आणि उद्योजकता विकास यासाठी ‘आयआयएम’चे काही अभ्यासक्रम आहेत. ओरॅकलसारखे कोर्स करून ‘डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन’; तसेच ‘सर्टिफाइड फायानान्शियल प्लानर’ हा कोर्स करून सल्लागार संस्था सुरू करता येते. याशिवाय मार्केट रिसर्च, टुरिझम, डिफेन्स अकाउंटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, रिटेल मॅनेजमेंट हे कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम करून करिअरला आकार देता येईल.

प्रगत अभ्यासक्रम स्वयंरोजगारपूरक
विज्ञान शाखेची पदव्युत्तर पदवी म्हणजे एमएस्सी केल्यानंतरही कौशल्ये मिळविण्यासाठी वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. रसायनांसंबधी उद्योगांसाठी ॲनालिटिकल केमिस्ट्री, ॲस्ट्रोफिजिक्‍सचे प्रगत अभ्यासक्रम, कमी ऐकू येणारांसाठी बनविण्यात येणाऱ्या यंत्रांच्या चाचण्यांसाठी ऑडियोमेट्री यांसारखे अभ्यासक्रम करता येतात. दृकश्राव्य माध्यमाची सध्या चलती आहे. त्यासाठी ध्वनिमुद्रकांची गरज असते. यात करिअर करण्यासाठी साउंड रेकॉर्डिंगचे पदविका अभ्यासक्रम असतात. अभियांत्रिकी शाखेत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून कॅड-कॅम, ऑटोमेशन, रोबोटिक्‍स, इलेक्‍ट्रॉनिक्‍स एम्बेडेड सिस्टिम, वजनाने हलक्‍या व टिकाऊ वस्तूनिर्मितीसाठी नॅनो मटेरियलसंबंधी कौशल्ये विद्यार्थी आत्मसात करू शकतात. ऊर्जा क्षेत्राशी संबंधी सोलर पॅनेल, इंधन विकास; तसेच बायोमेट्रिक तंत्रज्ञानाची कौशल्ये मिळवल्यास ते रोजगारासाठी उपयुक्त ठरू शकतात. 

कल्पकता,  लेखनाला संधी
एमए करताना भाषेवर प्रभुत्व मिळविले तर चित्रपट, मालिकांचे पटकथालेखनात चांगले करिअर करता येते. त्यासाठी पटकथालेखनाचे कौशल्य मिळवावे लागेल. कोणतीही वस्तू बाजारपेठेत विकायची असेल, तर त्यासाठी प्रभावी जाहिरात करावी लागते. ती तयार करण्यासाठी अंगी कल्पकता असावी लागते. म्हणूनच जाहिरातलेखन हेदेखील स्वतंत्रपणे उदयास आलेले चांगले क्षेत्र आहे. त्यासंबंधीचे कौशल्य देणारेही छोटे अभ्यासक्रम केल्यास थोडा अनुभव घेऊन जाहिरात संस्था सुरू करता येते. सध्या प्रत्येक पालकाला आपल्या मुलाकडे एक तरी कला असावी, असे वाटते. ललित कलेची पदव्युत्तर पदवी घेतल्यास नृत्य, संगीत, अभिनय यांच्या खासगी प्रबोधिनी सुरू करता येतात. शाळांमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करता येते.

Web Title: pune news Career Certificate Courses