भाजप खासदार संजय काकडेंविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

न्यायालयाच्या आदेशानुसार काकडे यांच्यासह चौघांविरुद्ध 420, 406, 465, 467, 468 कलमान्वये शुक्रवारी रात्री वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर फसवणूक करणे, शासनाची दिशाभूल करणे असे आरोप आहेत.

पुणे : न्यू कोपरे येथील जमीन विकसनात फसवणूक केल्याच्या आरोपात सकृद्दर्शनी तथ्य दिसत असल्याने बांधकाम व्यावसायिक आणि भाजप खासदार संजय काकडे यांच्यासह चार जणांविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काकडे यांच्यासह त्यांचे भाऊ सूर्यकांत काकडे, अशोक यादव आणि काकडे कन्स्ट्रक्‍शन कंपनीविरुद्ध दिलीप मोरे यांनी न्यायालयाकडे तक्रार केली होती. मोरे यांच्यातर्फे ऍड. नारायण पंडित आणि ऍड. सुरेखा वाडकर यांनी बाजू मांडली होती. पुनर्वसन योजनेतंर्गत राज्य सरकारने न्यू कोपरे येथील जागा ग्रामस्थांना दिली होती. या 38 एकर जमिनीपैकी 14 एकर जमिनीसंदर्भात ग्रामस्थांनी काकडे यांच्याशी विकसन करार केला होता. उर्वरित जमीन काकडे यांनी "करेक्‍शन डीड' करून बळकाविली, विकसन करारानुसार प्रथम ग्रामस्थांना घर न देता व्यावसायिक बांधकाम केले, तीन वर्षांच्या मुदतीत घराचा ताबा दिला नाही, 433 पैकी 81 जणांना घरांचा ताबा दिला नाही, त्यांना कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई दिली गेली नाही, अशी तक्रार न्यायालयाकडे केली गेली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 

न्यायालयाच्या आदेशानुसार काकडे यांच्यासह चौघांविरुद्ध 420, 406, 465, 467, 468 कलमान्वये शुक्रवारी रात्री वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर फसवणूक करणे, शासनाची दिशाभूल करणे असे आरोप आहेत.

Web Title: Pune news case filed against BJP MP Sanjay Kakade