Pune News : खाद्य पदार्थाच्या स्टॉलला लाथ मारण्याचं प्रकरण भोवलं; आता अतिक्रमण विभागासाठी...| Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

Pune News : खाद्य पदार्थाच्या स्टॉलला लाथ मारण्याचं प्रकरण भोवलं; आता अतिक्रमण विभागासाठी...

पुणे : अतिक्रमण कारवाई करताना खाद्य पदार्थाच्या स्टॉलला लाथ मारल्याने अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप वादात सापडले आहेत. त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी राजकीय पक्ष, संघटनांकडून केली जात असताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जगताप यांच्या अधिकारांना कुंपण घातले आहे. अतिक्रमण विभागाची जबाबदारी आता दोन उपायुक्तांकडे असणार आहे. जगताप यांचे अधिकार छाटण्यात आले आहेत.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची जबाबदारी एकाच उपायुक्ताकडे होती, त्यामध्येही माधव जगताप हे गेल्या अनेक वर्षापासून या विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. अतिक्रमण कारवाई करताना जगताप यांनी स्टॉलला लाथ मारल्याचा व्हिडिओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईच मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी जगताप यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. त्याच दरम्यान आयुक्तांनी हे प्रशासकीय बदल केले आहेत.

महापालिकेत राजू नंदकर हे नवे अधिकारी उपायुक्त म्हणून रुजू झाले आहेत. त्यांना परिमंडळ एक व दोनची अतिक्रमण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर माधव जगताप यांना तीन, चार व पाच परिमंडळाची जबाबदारी दिली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश काढले आहेत.

दरम्यान जगताप यांच्याकडील आकाशचिन्ह, सुरक्षा या दोन्ही विभागाची जबाबदारी कायम ठेवली आहे. तर नंदकर यांच्याकडे अतिक्रमणसह मोटर वाहन विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, प्रशिक्षण प्रबोधिनीची जबाबदारी दिली आहे.

याच प्रमाणे महेश डोईफोडे यांच्याकडील मोटर वाहनची विभागाची जबाबदारी काढली आहे. त्याऐवजी त्यांना पर्यावरण, मंडई, बीओटी सेल व तांत्रिक विभाग ही जबाबदारी दिली आहे. तर महेश पाटील यांच्याकडे पूर्वी दक्षता व आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी होती, त्यात आता मालमत्ता व्यवस्थापन विभागाची भर पडली आहे.

उपायुक्तांमध्ये समन्वय आवश्‍यक

शहराची वाढलेली हद्द, लोकसंख्या आणि त्याच प्रमाणात अतिक्रमण, अनधिकृत बांधकामातही वाढ होत आहे. पूर्वी जगताप यांच्याकडे या विभागाची संपूर्ण जबाबदारी असल्याने उपायुक्त म्हणून ते निर्णय घेतल्यानंतर सर्व शहराला लागू होत होता. मात्र, आता दोन उपायुक्त झाल्यानंतर कारवाईचे नियोजन, धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी यात समन्वय असणे आवश्‍यक आहे. आधीच गोंधळाची स्थिती असताना त्यात आणखीन भर पडून नागरिकांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Pune Newspmc