सेवा-सुविधा देण्याचे आव्हान

रविवार, 23 जुलै 2017

पुणे - गल्लीबोळांत उभारलेली बांधकामे, त्याच प्रमाणात वाढलेली लोकसंख्या, त्यामुळे मूलभूत सेवा-सुविधांवरील ताण, विशेषतः अपुरे रस्ते, पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन, या बाबी धायरी, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक गावांमध्ये पुरविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. आमची गावे महापालिकेत घेण्याआधी पाणीपुरवठा योजना आखावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तसेच, सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याची मागणीही गावकऱ्यांची आहे. दुसरीकडे, गावांच्या नियोजनाचा स्वतंत्र आराखडा करून गावकऱ्यांना त्याचे सादरीकरण करावे, अशी अपेक्षाही त्यांची आहे.

पुणे - गल्लीबोळांत उभारलेली बांधकामे, त्याच प्रमाणात वाढलेली लोकसंख्या, त्यामुळे मूलभूत सेवा-सुविधांवरील ताण, विशेषतः अपुरे रस्ते, पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन, या बाबी धायरी, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक गावांमध्ये पुरविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. आमची गावे महापालिकेत घेण्याआधी पाणीपुरवठा योजना आखावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तसेच, सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याची मागणीही गावकऱ्यांची आहे. दुसरीकडे, गावांच्या नियोजनाचा स्वतंत्र आराखडा करून गावकऱ्यांना त्याचे सादरीकरण करावे, अशी अपेक्षाही त्यांची आहे.

आंबेगाव बुद्रुक - बेकायदा बांधकामांना पेव 
उपनगरांमध्ये सर्वाधिक वेगाने बांधकामे उभारली ती आंबेगावात बुद्रुक. मात्र, गावालगतच्या पुणे- बंगळूर मार्गालगतची बहुतांशी बांधकामे बेकायदा आहेत. परिणामी, बांधकामे वाढली; पण पायाभूत सेवा-सुविधा मात्र तेवढ्याच राहिल्या. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा प्रचंड ताण सेवा-सुविधांवर आल्याने गावाचे ‘गावपण’ हरविल्याची प्रचिती आंबेगावात दिसून येते. मूळ प्रश्‍न तो येथील पिण्याच्या पाण्याचा आहे. गेली अनेक वर्षे रहिवाशांना हा प्रश्‍न भेडसावतो आहे. गावात आजघडीला दिवसाआड तेही जेमतेम दीड- दोन तास पाणीपुरवठा होतो. शिवाय, पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा पुरविण्यात येते. पण, त्याचे वेळापत्रक रोज कोलमडते. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे या भागात सर्रास अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे ‘पीएमपी’ सेवा विस्तारल्यास गावकऱ्यांची सोय अधिक होईल. त्यामुळे गाव महापालिकेत घेताना, नव्या गावांसाठी जादा बसगाड्या उपलब्ध कराव्यात, असे गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जाणवले. 

वाहतूक, कचऱ्याची समस्या 
गावातील प्रमुख रस्ते चांगले असले, तरी गावाला जोडलेल्या रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे गावात सार्वजनिक वाहतूक सेवा देण्याआधी पुरेसे आणि चांगले रस्ते बांधण्याची गरज असल्याचे दिसून आले. गावात रोज मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो, तो उचलण्याची व्यवस्था सक्षम नसल्याने कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. कचरा गोळा करण्यासाठी कुठेही कुंड्या ठेवलेल्या नाहीत, त्यामुळे मोकळ्या जागांवर कचरा पडलेला असतो. विशेष म्हणजे, महापालिकेच्या हद्दीतील ओढ्या-नाल्यांत कचऱ्याचे ढीग पडले आहेत. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पावले उचलण्याची गावकऱ्यांची मागणी आहे.

आंबेगाव खुर्द - वाहतूक सेवा विस्कळित 
आंबेगाव बुद्रुक पाठोपाठ आंबेगाव खुर्द मधील चित्र फारसे काही निराळे नाही. या गावात जागोजागी भल्यामोठ्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. गावातील प्रचंड वर्दळीच्या रस्त्यालगतच अतिक्रमणे थाटल्याने वाहतूक विस्कळित होते. सातत्याने मागणी करूनही या गावात सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारलेली नाही, त्यामुळे गावातील चौकात उतरणाऱ्यांना पायी प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे महापालिकेत गाव येत असल्याचा आनंद झाल्याचे सांगण्यापेक्षा ‘आम्हाला पीएमपीची सेवा मिळेल का,’ असाच प्रश्‍न गावकऱ्यांनी विचारला. त्यापाठोपाठ वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याची तक्रार त्यांनी मांडली. पाण्यासाठी रोज चार- पाच तास घालावे लागतात, तरीही पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार एका महिलेने केली. 

ठिकठिकाणी कचरा 
गावात जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर दिवसभर वाहनांची मोठी गर्दी असते; पण सायंकाळी रस्त्यालगत दुकाने सुरू केली जात असल्याने वाहतूक खोळंबते. ज्या प्रमाणात गावात नागरीकरण झाले, त्याच्या तुलनेत पुरेसे रस्ते नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याबरोबरच सार्वजनिक वाहतूक सेवा आणि त्याकरिता चांगले रस्ते हवेत. कचऱ्याची समस्या फारशी जाणवत नसली, तरी तिच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना नसल्याची बाब जागोजागी पडलेल्या कचऱ्यावरून जाणवली.

धायरी - नैसर्गिक नाले झाले गायब  
सिंहगड रस्त्यालगत असलेल्या धायरीत घरे घेण्यासाठी अनेक नागरिकांनी पसंती दिली. परिणामी, फारशा सेवा-सुविधा नसल्या, तरी येथील नागरीकरण झपाट्याने वाढत गेले. ते अजूनही वाढतेच आहे. गावाच्या चहूबाजूंनी मोठमोठ्या इमारती उभारल्या. त्यात, नैसर्गिक ओढे-नालेही गायब झाले. ओढ्या-नाल्यांवर इमारती दिसू लागल्या आहेत. 

तर, काही ठिकाणी नाल्यांवरून रस्ते करण्यात आले आहेत. त्यामुळे बेकायदा बांधकामांचा प्रश्‍न गंभीर असल्याचे गावात पाहणी केल्यानंतर दिसून आले. 

पिण्याचे पाणी मिळेना 
विशेष म्हणजे, गावात अजूनही पिण्याचे पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांचे हाल होत असल्याच्या तक्रारी आहेत. महापालिकेच्या हद्दीतून त्यांना पिण्याचे पाणी आणावे लागते. त्यामुळे महापालिकेत आल्यानंतर पुरेसे पाणी मिळेल, अशी अपेक्षा धायरीतील रहिवाशांची आहे. त्यासाठी, नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्याची गरज तेथील रहिवाशांनी व्यक्त केली. दुसरीकडे, ज्या प्रमाणात या गावाची लोकसंख्या वाढली, त्याच वेगाने वाहनांचेही प्रमाण वाढले. साहजिक उपलब्ध रस्ते तोकडे ठरू लागले.

गावालगतच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळते. मुळात, रस्त्यांचा दर्जाच चांगला नसल्याने ते पूर्णपणे उखडलेले असून, त्यामुळे येथील प्रवास जीवघेणा ठरू शकतो. या पार्श्‍वभूमीवर चांगले आणि रुंद रस्ते बांधावेत, अशी नागरिकांची मागणी आहे. गावात जमा होणारा कचरा घरोघरी जाऊन रोजच्या रोज उचलण्यात येतो; पण त्याची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे.