चांदणी चौकातील उतारावर डंपरचा ब्रेक फेल; 2 ठार, 1 गंभीर जखमी

चांदणी चौकातील उतारावर डंपरचा ब्रेक फेल; 2 ठार, 1 गंभीर जखमी

पुणे : चांदणी चौकाकडून कोथरूडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तीव्र उतारावरच डंपरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. यामध्ये दोन मृत्युमुखी पडले असून, एका जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत. 

पूजा चव्हाण यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तर निकिता नवले या शाळकरी मुलीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. शीतल राठोड या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर चांदणी चौकाकडून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. 

प्रत्यक्षदर्शी बंटी सातपुते व दीपक कुडले यांनी सांगितले की, आम्ही भूगाववरून कोथरूडला निघालो होतो. सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन महिला मुलीला शाळेत सोडायला पायी निघाल्या होत्या. डंपरने पायी निघालेल्या या तिघांना उडवले. यातील एक महिला जोरात उडून पोलला धडकली. तिच्या शरीरातील आतडे बाहेर पडले. लहान मुलीच्या पायाचा चेंदामेंदा झाला. दोघींची स्थिती गंभीर होती. एक महिला जागेवरच मृत्युमुखी पडली होती. ते दृष्य बघवत नव्हते. बघ्यांची गर्दी झाली पण एकही मदतीला पुढे येत नव्हते. एका इको गाडीत आम्ही सर्वांना ठेवले. ड्रायव्हरने तिथे आणखी एका गाडीला धडक दिली होती. सुदैवाने त्यातील लोकांना फारशी दुखापत झाली नाही.

चांदणी चौकात सहा रस्ते येथे येऊन मिळतात. त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढतच आहे. कोथरूडकडे जाणाऱ्या रस्त्याला तिथे तीव्र उतार असून, तिथूनच सातारा रोड जोडला जातो. त्यामुळे येथून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. हा तीव्र उतार कमी करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. या ठिकाणचे सर्व्हिस रोड पूर्ण झालेले नाहीत. अशातच या रस्त्याच्या लगत बहुमजली इमारतीला परवानगी देण्यात आली आहे. अशा प्रकारे परवानगी कशी दिली जाते, हा मुद्दा यामुळे पुन्हा चर्चिला जाऊ लागला आहे. तसेच, अनधिकृत वाहतूक करणाऱ्यांमुळे येथील कोंडीत आणखी भर पडत आहे. 

या ठिकाणी मिळणाऱ्या सहा रस्त्यांचा एकत्रित विचार करून विकास करणे आवश्यक आहे. येथे होणाऱ्या गर्दीचे नियोजन करणे आवश्यक झाले आहे. या ठिकाणी 2013 पासून बहुमजली उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. मात्र, अद्याप त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. 

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com