चित्रपट निर्माता असल्याचे भासवून फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

पुणे - चित्रपटाचा दिग्दर्शक, निर्माता असल्याचे सांगून मॉडेल तरुणींची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्याच्याविरुद्ध यापूर्वी नवी मुंबई, रत्नागिरी आणि पणजी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

पुणे - चित्रपटाचा दिग्दर्शक, निर्माता असल्याचे सांगून मॉडेल तरुणींची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्याच्याविरुद्ध यापूर्वी नवी मुंबई, रत्नागिरी आणि पणजी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

संदीप महादेव व्हरांबळे ऊर्फ सॅंडी पाटील (वय 32, रा. हळदी, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता असल्याचे भासवून तो महाराष्ट्र आणि गोव्यातील मॉडेल्स आणि छायाचित्रकारांना गोड बोलून जाळ्यात अडकवत असे. याबाबत युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले-पाटील यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी चित्रपट महामंडळाच्या सदस्यांच्या मदतीने आरोपीला शिताफीने अटक केली. आरोपी संदीप पाटील हा जस्ट डायल, फेसबुक आणि सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून मॉडेलिंगसाठी इच्छुक असलेल्या तरुणी आणि छायाचित्रकारांना हेरून त्यांच्याशी संपर्क साधत असे.

छायाचित्रकारांकडून त्या तरुणींचे फोटोशूट करून घेत असे. त्यानंतर तरुणींना चित्रपट आणि जाहिरातीत काम देतो, असे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळून पसार व्हायचा. अशाप्रकारे त्याने धायरीतील उत्कर्ष केळकर या छायाचित्रकाराची दोनदा फसवणूक केल्याचे समोर आले. त्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि गोव्यातील छायाचित्रकार आणि तरुणींची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्‍त आयुक्‍त प्रदीप देशपांडे, पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ आणि सहायक आयुक्‍त सुरेश भोसले यांच्या सूचनेनुसार युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.

फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधावा
आरोपी संदीप पाटील याच्या पत्नीने सन 2013 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पत्नीसोबत वाद झाल्यानंतर तो फोटोशूटच्या निमित्ताने तरुणींशी जवळीक साधत होता. गेल्या दोन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, फसवणूक झालेल्या नागरिकांनी गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: pune news cheating