दुकानदारी

दुकानदारी

शॉर्टफिल्म स्पर्धांचे पीक वाढले, बक्षिसांचे आमिष दाखवून फसवणूक

पुणे - चित्रपटविषयक शिक्षण घेणाऱ्या तरुणांमध्ये सध्या ‘शॉर्ट फिल्म’ बनवण्याचे वारे वाहत आहे. हा बदल हेरून शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल किंवा इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन आयोजित केल्या जात आहेत. त्यात सहभागी होण्यासाठी एक हजार रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत प्रवेशशुल्क आकारले जाते; पण प्रत्यक्षात यापैकी अनेक स्पर्धा होतच नाहीत आणि झाल्या तर बक्षिसांची रक्कमच दिली जात नाही. प्रवेश शुल्क घेऊन घरबसल्या लाखो रुपये कमविण्याच्या या ‘दुकानदारी’मुळे कलाकारांची फसवणूक होत आहे.

प्रसंग १
शारीरिक शोषणावर आधारित ‘अबोली’ ही शॉर्ट फिल्म तयार केली. या फिल्मचे पुढे काय करायचे, असा विचार करताना ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून एका शॉर्ट फिल्म स्पर्धेची माहिती माझ्यापर्यंत पोचली. प्रवेश शुल्क दोन हजार रुपये होते. ते मी डीडीद्वारे आयोजकांना दिले. पैसे भरल्यानंतर आयोजकांनी मला संपर्कच केला नाही. म्हणून मीच काही दिवसांनी आयोजकांना दूरध्वनी केला. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘तुमची फिल्म ज्युरीने नाकारली आहे’. पैसे परत द्या, असे म्हटले तर ‘ते मिळणार नाहीत’, असे सांगितले गेले. स्पर्धा कुठे, कधी हेही कळविले गेले नाही. हा अनुभव मला एकट्यालाच नव्हे अनेक जणांना आला. त्यामुळे कळले की फसवणूक होती... सांगत होते दिग्दर्शक विनय जवळगीकर.

प्रसंग २ 
इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन आहे. तुमची फिल्म पाठवा, अशी जाहिरात ‘फेसबुक’वर दिसली. म्हणून मी लगेच माझी ‘संतुलन’ ही शॉर्ट फिल्म पाठवली. त्यासोबत आयोजकांनी सांगितलेल्या बॅंक खात्यावर एक हजार रुपये प्रवेश शुल्कही पाठवले. माझ्यासह सर्व सहभागी स्पर्धकांचे प्रवेश शुल्क पाठवून झाल्यानंतर आयोजकांनी त्यांचे मोबाईल क्रमांक बंद केले. काही दिवसांनी आयोजकांना ई-मेल पाठवला. त्याला उत्तर आले की, ‘तुमच्या शॉर्ट फिल्मने स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे.’ मात्र, स्पर्धा कधी आणि कोठे झाली, ज्युरी कोण होते? हे मला कळवले गेले नाही आणि आजपर्यंत बक्षिसाची रक्कमही आली नाही... असा अनुभव दिग्दर्शक योगीसिंह ठाकूर यांनी सांगितला. कथा लेखनापासून चित्रीकरणापर्यंत वेगवेगळ्या पातळ्यांवर आम्ही प्रचंड मेहनत घेऊन शॉर्ट फिल्म बनवत असतो; पण अशी फसवणूक होत राहिली तर या क्षेत्रात कलावंत कसे तयार होणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल किंवा स्पर्धा गांभीर्याने, मोठ्या जबाबदारीने आयोजित करायला हव्यात; पण सध्या हे गांभीर्य, जबाबदारी अनेक महोत्सवांमध्ये दिसत नाही. त्यामुळे चांगल्या महोत्सवांना धक्का बसत आहे. हे चित्र बदलण्यासाठी कुठल्या तरी यंत्रणेचे अशा महोत्सवांवर लक्ष असायला हवे. त्यामुळे कोणीही उठसूट महोत्सव घेणार नाही आणि यातून फसवणूकही होणार नाही.
- उमेश कुलकर्णी, दिग्दर्शक

चित्रपट महामंडळाकडून ‘झाडाझडती’

‘‘शॉर्ट फिल्म स्पर्धेत फसवणूक झाली, अशा तक्रारी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडे येत आहेत. गेल्या काही महिन्यांत या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा स्पर्धांवर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. अशा स्पर्धांपूर्वी शहानिशा करून संबंधितांना स्पर्धेसाठी महामंडळाकडून मान्यता दिली जात आहे. यापुढे जाऊन स्पर्धांसाठी विशेष नियमावलीही तयार केली जात आहे. यामुळे आयोजकांची विश्‍वासार्हता टिकून राहील आणि तरुण कलाकारांची फसवणूकही होणार नाही’’, असे चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले. नियमावलीबरोबरच भरारी पथकही यापुढे अशा स्पर्धांवर लक्ष ठेवेल, असे सांगून ते म्हणाले, ‘‘स्पर्धेचे प्रवेश शुल्क पाच हजार रुपयांपर्यंत घेतले जाते. असे शुल्क देऊन ठिकठिकाणांहून किमान ५०० ते ८०० शॉर्ट फिल्म स्पर्धेत सहभागी होतात. हा एक नवा ‘व्यवसाय’च सुरू झाला आहे; पण तो पारदर्शीपणाने होत नाही, असे अनुभव वाढत आहेत.’’

हे तपासा...

शॉर्ट फिल्म स्पर्धेला चित्रपट महामंडळाची मान्यता आहे का

स्पर्धेचे आयोजक या क्षेत्रातील अनुभवी, विश्‍वासार्ह आहेत का

स्पर्धेचा मागील काही वर्षांतील रेकॉर्ड पाहिले आहे का

सर्व शॉर्ट फिल्म थिएटरमध्ये दाखवल्या जाणार आहेत का

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com