‘शिवराज्याभिषेका’ची तरुणांमध्ये ‘क्रेझ’ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

पुणे - स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले रायगडावर दरवर्षी ६ जून रोजी ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यासाठी रायगडावर ट्रेकिंग तसेच शिवकालीन साहसी खेळ, ढोल, ताशा, लेझीम व झांज पथकांमध्ये शिवप्रेमी तरुणांचा सहभाग वाढत चालला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याची ‘क्रेझ’ तरुणांमध्ये वाढत चालली आहे. 

किल्ले रायगडावर ४ जूनपासून शिवप्रेमी तरुणांचे जत्थे यायला सुरवात होते. काही ट्रेकिंग ग्रुप, शिवप्रेमी संघटनांकडून किल्ल्यावर साफसफाई, समाधी स्थळ आणि मेघडंबरी परिसरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. वृक्षारोपण, शिवराज्याभिषेकासाठीच्या कार्यक्रमांची रंगीत तालीम, पायऱ्यांची दुरुस्ती केली जाते. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर, सातारा आणि पुण्यातील तरुणांचा जास्त सहभाग असतो. पुण्यातून या सोहळ्यासाठी साधारणतः २० ते २५ हजार तरुण जातात. 

या संदर्भात सविस्तर माहिती देताना सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश खुटवड ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, ‘‘दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतो. आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून २५ ते ३०च्या गटाने १ जूनपासून किल्ले रायगडाकडे तरुण जातात. दुचाकी किंवा चारचाकी वाहनांनी रायगडाच्या पायथ्याशी जाऊन ५ जूनला पहाटे किल्ल्यावर पायी चढाईला सुरवात केली जाते. किल्ल्यावर स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असे उपक्रमदेखील राबविले जातात.’’

शिवराज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी सुमारे २ लाख शिवप्रेमी रायगडावरील सोहळ्यासाठी जमतात. त्यामध्ये पुण्याचे ‘सह्याद्री गर्जना’ ढोलताशे पथक, मुंबईचा गजर, रणवंद्य तर कोल्हापूरचे करवीरनाथ आणि पेणचे शिवतीर्थ प्रतिष्ठान ही पथके येतात. पुणे आणि कोल्हापूरचे शिवकालीन मर्दानी आखाडे साहसी खेळ सादर करतात. मुख्य कार्यक्रमाला छत्रपती संभाजी महाराज हजेरी लावतात. शिवशक कालगणनेच्या स्मृती जपण्यासाठी किल्ला तसेच पुण्यातील शनिवारवाडा, लालमहालपासून शिवनेरीपर्यंत ‘स्वराज्यगुढी’ उभारण्यात येते.’’
- अमित गायकवाड, समन्वयक, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती

Web Title: pune news Chhatrapati Shivaji Maharaj