"सोपं असेल तर ते आयुष्य कसलं...' 

"सोपं असेल तर ते आयुष्य कसलं...' 

पुणे -  ""सोपं असेल तर ते आयुष्य कसलं...? अडचणी, आव्हानं ही तर हवीतच ! गुळगुळीत रस्ते फार उपयोगाचे नाहीत. रस्त्यात खड्डे नसतील तर त्यातून मार्ग काढण्यासाठीची प्रगल्भता नाही येणार. तावून-सुलाखून निघालं नाही तर ते सोनं निखरेल कसं...?'' अशा अंगी स्फुल्लिंग फुंकणाऱ्या शब्दांत मंचावरून छवी राजावत बोलत गेल्या आणि समोर प्रचंड संख्येने उपस्थित श्रोतृवर्ग ते आपल्या नखशिखांत साठवत गेला... "अपयश असं काही नसतंच. तोही खरंतर अनुभवाचा एक टप्पा असतो. तो पार करायचा आणि पुढे जायचं', असं त्यांनी सहजतेने म्हटल्यानंतर झालेला टाळ्यांचा कडकडाट तर अनेकांच्या पुढच्या वाटांची दिशा स्पष्ट करून जाणारा होता. 

ऐकणाऱ्या-पाहणाऱ्या प्रत्येकाला एका विजिगीषू वृत्तीचं जणू बाळकडूच पाजणारे हे प्रेरक शब्द होते, भारतातल्या पहिल्या "महिला एमबीए सरपंच' असणाऱ्या आणि वयाच्या पस्तीशीतच अवघ्या देशातल्या तरुणाईच्या "आयकॉन' बनलेल्या छवी राजावत यांचे! "सकाळ'चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त बुधवारी सायंकाळी छवी राजावत यांचे हे अमोघ वक्‍तृत्व तुडुंब भरलेल्या बालगंधर्व रंगमंदिरात उपस्थित प्रत्येकाने आपल्या कानांत कायमचं साठवून घेतलं. राजावत आपल्या आयुष्यातील अनुभव पुढ्यात उपस्थित तरुणाईशी हिंदी-इंग्रजी मिश्र भाषेत शेअर करत होत्या अन्‌ समोरचा प्रत्येक जण त्याच्याशी थेट कनेक्‍ट होत एका वेगळ्याच विश्वात जाऊन पोचत होता. सुमारे तासभर ही वैचारिक मैफल सुरू होती. "सामाजिक बदलाव में युवा शक्ति का महत्त्व' या विषयावर त्या बोलल्या. या वेळी "सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार, "सकाळ'चे संपादक मल्हार अरणकल्ले उपस्थित होते. 

राजावत म्हणाल्या, ""सर्वसामान्य लोक सशक्त झाले, तर आपली ताकद कमी होईल की काय, ही भीती अनेकांना असते. विकास झाला, प्रगती झाली, तर अनेकांच्या हितसंबंधांना धक्के पोचण्याची भीती निर्माण होते. त्यामुळे विकासाच्या मार्गात अडथळे आणणारे अनेक चेहरे असतात; पण मी सांगेन- बाधा कितीही येऊ देत, हमें डटें रहना ही है ! माझ्यावरही दोन वेळा प्राणघातक हल्ले झाले. मला पोलिस संरक्षणही मिळालं नाही. अनेक अडचणी आल्या; पण मी लोकांसाठी सुरू केलेली कामं थांबवली नाहीत.'' 

त्या पुढे म्हणाल्या, की एक स्थिर आणि उत्तम आयुष्य मी जगत होते. एकेदिवशी अचानक गावातले लोक घरी आले. त्यांना माझ्याकडून अपेक्षा होती- मी गावची सरपंच व्हावं. महिलांसाठी त्यावेळी राखीव जागा होती. ग्रामस्थांनी मला गळ घातली; पण मी त्यांना म्हटलं- "मुझे बुला तो रहें हो आप, लेकिन आप खुश नहीं होंगे... अगर कुछ गलत काम हो रहा हैं, तो हम किसी भी हाल में वह पूरी तरह से रोकेंगे'... मला एक गोष्ट कळत होती, आपल्याला लोकांनी निवडलं आहे, तर लोकांच्या हक्कांचा विचार आपण करायलाच हवा. आपल्या कामात पारदर्शकता हवी !... मी याच बळावर गावकऱ्यांचा विश्वास जिंकला. त्यातून सोडा गावात अनेक वर्षांनी श्रमदान सुरू झालं. 

आमच्या गावात कधीही लाच दिली जात नाही. घेतली जात नाही. मी स्वतः एक रुपयाही न देता निवडून आली आहे. खरा विकास जेव्हा होतो, तेव्हा लोकांना ते कळत असतं. लोक नेहमीच पैशांच्या भरीला पडतात असं नाही, असं त्यांनी आपल्या भाषणाच्या अखेरच्या टप्प्यावर म्हटलं, तेव्हा टाळ्यांचा उत्स्फूर्त कडकडाट बराच वेळ थांबलाच नाही. 

छवी राजावत म्हणाल्या : 
- लक्षात ठेवा- "बुंद बुंद से घडा भरता है।'... मी एकटा आहे, मला हे कसं शक्‍य आहे, असं नैराश्‍य नको! आशावादच घडवेल उद्याच्या बदलांची यशस्वी नांदी 
- परिवर्तन घडतंच; पण निष्ठा हवी. सातत्य हवं. लोक मदतीला येतात. 
- ग्रामीण भागातल्या समस्यांवर गरजा पाहून उत्तरं शोधायला हवीत; अन्यथा विकास काय उपयोगाचा? संपूर्ण देशात एकच उत्तर नाही देता येणार हे समजून घ्या! 
- समस्या तर रोजच असतात आपल्यापुढे; पण आपण दुर्लक्ष केलं, तर तर बदल घडतील कसे? आपल्या पुढच्या पिढीपुढे आपण काय सकारात्मक आदर्श ठेवणार आहोत? 
- कुणीतरी दुसऱ्याने आपल्यासाठी काहीतरी करावं, यापेक्षा आपणच स्वतःसाठी उभं का राहू नये. 
- निसर्गाशी नव्या पिढीचं नातं राहिलेलं नाही. झाडं, प्राणी, पक्षी हवे आहेत. नुसतं शिक्षण काय कामाचं? 
- संवेदनशीलता ही उणीव नाही, ती तर आहे आपली ताकद! 

"डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार'  
या वेळी "सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम'चे (एसआयटी) वरिष्ठ बातमीदार गोविंद तुपे यांना, तसेच "सकाळ'च्या मुंबई आवृत्तीचे बातमीदार किरण कारंडे आणि हर्षदा परब यांना यंदाचा "डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार' राजावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विविध विषयांवर आणि सामाजिक प्रश्‍नांवर सातत्याने लेखन करणाऱ्या "सकाळ'च्या बातमीदारांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार (कै.) ना. अ. पेंडसे यांनी दिलेल्या निधीतून हा पुरस्कार देण्यात येतो. 

तसेच भाऊ मरगळे, संतोष टिकेकर, गंगूबाई आंबेकर या सरपंचांचा आणि मोठ्या पगाराची नोकरी सोडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या अशोक आणि अर्चना देशमाने, तसेच अपघातग्रस्त तरुणाला वेळेवर मदत करणाऱ्या सानिया कुलकर्णी, ऋतुजा बुडुख, रझिया खान यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. 

"आप सबको नमश्‍कार !'... 
देवीचा उत्सव असणाऱ्या घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला स्त्रीशक्तीच्या अनेक रूपांची आगळीवेगळी "छवी' मंचावर अवतरत बोलत असलेली पाहून उपस्थित हरखून गेले होते. वक्तशीरपणाचं चालतंबोलतं उदाहरण म्हणावं, अशा उत्साहात छवी कार्यक्रमाच्या पाऊण तास आधीच रंगमंदिरात येऊन पोचल्या होत्या. आपली खास ओळख असलेल्या जीन्स-कुर्त्याच्या पोशाखात त्यांनी तरुणांना "मी तुमच्यातलीच एक आहे' असं जणू सांगत संबोधायला सुरवात केली. त्यानंतर उलगडत गेलं ते त्यांच्या सोडा गावातल्या बदलांचं गमक आणि प्रसंगी व्यवस्थेशी दोन हात करायला तयार असणाऱ्या या ध्यासवेड्या बाईची अनोखी कहाणी !... "आप सबको नमश्‍कार !' म्हणत त्यांनी सुरू केलेलं भाषण पुढे रंगतच गेलं. 

जब आवाज उठती हैं... बदलाव जरुर आता है! 
""जब आवाज उठती हैं, बदलाव जरुर आता है! उससे जो सुकून मिलता हैं, वह पैसों से नहीं मिल पाता. परिस्थिती बदलनेमें वक्त जरुर लगता हैं, लेकिन बदलाव आतें हैं जरुर... लोकसहभाग ही जादूची कांडी असते. ती एकदा सकारात्मक दिशेने फिरू लागली ना, की बदलांचे वारे वाहू लागतात,'' अशा शब्दांत छवी यांनी लोकसहभागाचं महत्त्व स्पष्ट केलं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com