मुलांनी साकारले इको फ्रेंडली गणराय  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करताच मुलांनी शाडूच्या मातीला आकार देण्याचे काम सुरू केले. त्यांच्या सोबतीला त्यांचे पालकही होते. मार्गदर्शक जसे सांगत त्या पद्धतीने मुलांनी शाडूच्या मातीवर आपली कलाकारी केली. मूर्ती तयार झाल्यानंतर सर्वांनी एकच जल्लोष केला. या वेळी मुलांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे धडे गिरवता आले.  

पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करताच मुलांनी शाडूच्या मातीला आकार देण्याचे काम सुरू केले. त्यांच्या सोबतीला त्यांचे पालकही होते. मार्गदर्शक जसे सांगत त्या पद्धतीने मुलांनी शाडूच्या मातीवर आपली कलाकारी केली. मूर्ती तयार झाल्यानंतर सर्वांनी एकच जल्लोष केला. या वेळी मुलांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे धडे गिरवता आले.  

निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजिलेल्या ‘सकाळ इको गणपती- २०१७’ कार्यशाळेचे. गार्डियन कॉर्पोरेशन प्रस्तुत इको फ्रेंडली गणपती बनविण्याची ही कार्यशाळा शहरात आठ ठिकाणी आयोजित केली होती. सर्व ठिकाणच्या कार्यशाळांना लहान मुलांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हे कार्यशाळेचे सहप्रायोजक होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचावे आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी ही कार्यशाळा आयोजिली होती. सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही कार्यशाळेला हजेरी लावली आणि आपल्या पाल्यासह शाडूची गणेशमूर्ती बनविण्याचा आनंद घेतला. 

‘स्ट्रोक्‍स संस्थे’च्या स्नेहल कुलकर्णी आणि चेतन पानसरे यांच्यासह विविध प्रतिनिधींनी आठही ठिकाणी विद्यार्थ्यांना शाडूची गणेशमूर्ती कशी बनवावी याविषयीचे मार्गदर्शन केले. सिटी इंटरनॅशनल स्कूल (कोथरूड), पुणे सेंट्रल मॉल (कर्वे रस्ता), अभिरुची मॉल मल्टिप्लेक्‍स (सिंहगड रस्ता), एसएसएमएस सनविध इंग्लिश मीडियम स्कूल (पर्वती), नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल (निगडी), सीएम इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी), ईस्ट कोर्ट- फिनिक्‍स मार्केट सिटी (विमाननगर) आणि माउंट लिथेरा झी स्कूल (वाकड) या ठिकाणी ही कार्यशाळा झाली. कार्यशाळेला या आठही संस्थांचे सहकार्य मिळाले. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला.  

मृण्मयी आणि आयुषी कुलकर्णी या दोघी अभिरुची मॉल मल्टिप्लेक्‍स येथे आयोजिलेल्या कार्यशाळेसाठी आल्या होत्या. याबाबत आयुषी म्हणाली, ‘‘मूर्ती बनवताना खूप मजा आली. मला मूर्ती बनवायला खूप आवडते, त्यामुळेच मी या कार्यशाळेला आले. आमच्या घरी शाडूच्या मातीचाच गणपती दरवर्षी असतो.’’

नमीश या छोट्या मुलाबरोबर प्रिया भामे कार्यशाळेसाठी आल्या होत्या. भामे म्हणाल्या, ‘‘लहानपणीच मुलांना पर्यावरणपूरक वस्तूंचे महत्त्व कळावे, यावर आमचा भर असतो. त्यामुळे ‘सकाळ’ने आयोजिलेल्या या कार्यशाळेला मी नमीशला घेऊन आले. मुलांनी सुंदर शाडूच्या मूर्ती घडविल्या.’’   

विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र 
‘सकाळ’तर्फे कार्यशाळेच्या ठिकाणी शाडू माती देण्यात आली होती. कार्यशाळेत तयार केलेली गणेशमूर्ती विद्यार्थ्यांनी घरी नेली. कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले. कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांसह पालकांनीही कार्यशाळेत सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त केला.

Web Title: pune news children eco friendly ganesh