काय विकणार, चॉकलेट की तंबाखू?

काय विकणार, चॉकलेट की तंबाखू?

पुणे - तंबाखू, सिगारेट असे तंबाखूजन्य पदार्थ आणि चॉकलेट, बिस्कीटसारखे अन्नपदार्थ यापुढे एकाच दुकानातून विक्री करण्यास राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बंदी घातली आहे. शालेय मुलांना व्यसनाधीनतेपासून रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी पुण्यात सुरू झाली आहे. याच्या पहिल्या टप्प्यात विक्रेत्यांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे.

आपण कोणत्याही दुकानात गेलो तरी तेथे तंबाखूजन्य पदार्थ सहजतेने मिळतात. त्याच वेळी त्या दुकानात लहान मुलांना आकर्षित करणारे खाद्य पदार्थ विक्रीसाठी ठेवलेले असतात. त्यामुळे खाद्य पदार्थाच्या ओढीने दुकानात आलेल्या लहान मुलाचे लक्ष कळत नकळतपणे तंबाखूजन्य पदार्थांवर जाते आणि त्या पदार्थांबद्दल त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण होते. त्यातून देशाचे भविष्य असलेली ही पिढी तंबाखूजन्य पदार्थांच्या विळख्यात सापडण्याचा धोका जाणवू लागला आहे. त्यावर वेळीच उपाय योजना करून देशाचे भविष्य सुरक्षित राखण्यासाठी ‘एफडीए’ने एकत्र वस्तू विक्रीस बंदीचा आदेश दिला आहे.

का दिला हा आदेश?
बहुतांश छोट्या दुकानांमध्ये चॉकलेट, चिप्स, शीतपेय आदी लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या पदार्थांची विक्री होत असते. त्याच दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थदेखील विकले जातात. लहान मुले अशा पदार्थांपासून दूर राहावीत, तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराला प्रतिबंध व्हावा, या दृष्टीने खाद्यपदार्थांसोबत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करून नये, असा आदेश अन्न सुरक्षा आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिला आहे.

  सुमारे दीड हजारावर विक्रेते
पानटपऱ्या आणि छोट्या दुकानांमधून तंबाखूजन्य पदार्थ आणि लहान मुलांचे खाद्य पदार्थ विक्री होताना दिसत असल्याचे निरीक्षण ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. पुण्यात सुमारे दीड हजारावर अशा प्रकारचे  विक्रेते आहेत.

बंदीला कायद्याचा आधार
मानवी आरोग्याच्या संरक्षणाची जबाबदारी भारतीय राज्यघटनेच्या ४७व्या अनुच्छेदाने राज्यावर टाकलेली आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार लहान मुले व तरुणांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवणे आणि मानवी आरोग्य अबाधित राहण्यास मदत करण्याची जबाबदारीही राज्यावर टाकली आहे. त्या आधारावर हा आदेश देण्यात आला आहे. अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार अन्नपदार्थांमध्ये तंबाखूचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यास घातक असून, त्यामुळे कर्करोग होत असल्याचे वैद्यकशास्त्राने सिद्ध केले आहे. 

तंबाखूजन्य पदार्थविरोधी कायदे
 गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू याच्या विक्री, वितरण आणि उत्पादनावर २०१२ पासून बंदी

 तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची लहान मुलांना विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारावासाची केंद्रीय बाल न्याय कायद्यात तरतूद

 शाळांच्या परिसरात तंबाखू, सिगारेट विक्रीवर बंदी

एकाच दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ आणि लहान मुलांचे खाद्यपदार्थ विक्री न करण्याच्या आदेशाची शहरात अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याबाबत सुरवातीला विक्रेत्यांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
- शिवाजी देसाई, सहआयुक्त, एफडीए, पुणे विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com