नाताळचा उत्साह आणि ‘रिच प्लम केक’

नागराज नायडू
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

नाताळ म्हणजे बालगोपाळांची चंगळ. सांताक्‍लॉजच्या पोतडीतील भेटवस्तूंबरोबरच विविध प्रकारचे केक हे याचे विशेष आकर्षण. नाताळनिमित्त तयार केल्या जाणाऱ्या ‘रिच प्लम केक’चे नाव काढले तरी मुलांच्याच नव्हे तर मोठ्यांच्याही तोंडाला पाणी सुटते. अशा केकसाठी लष्कर परिसरातील बाजारपेठ प्रसिद्ध आहे.

नाताळ म्हणजे बालगोपाळांची चंगळ. सांताक्‍लॉजच्या पोतडीतील भेटवस्तूंबरोबरच विविध प्रकारचे केक हे याचे विशेष आकर्षण. नाताळनिमित्त तयार केल्या जाणाऱ्या ‘रिच प्लम केक’चे नाव काढले तरी मुलांच्याच नव्हे तर मोठ्यांच्याही तोंडाला पाणी सुटते. अशा केकसाठी लष्कर परिसरातील बाजारपेठ प्रसिद्ध आहे.

कॅंटोन्मेंट परिसरात कयानी, पाश्‍चर, नाझ, मार्झोरीन, हुसैनी अशा नामवंत बेकऱ्या आहेत. त्यांच्याकडे वर्षभर विविध प्रकारचे केक मिळतात; पण नाताळनिमित्त खास तयार केल्या जाणाऱ्या केकला अधिक मागणी असते. येथील बेकरीमध्ये वर्षभर रिबन केक, चोको वॉलनट, स्पाँज केक, फ्रूट केक, पिस्ता केक आदी प्रकारचे ताजे आणि स्वादिष्ट केक उपलब्ध असतात. त्यांची किंमत ८० ते १०० रुपये इतकी असते. नाताळच्या दिवसांत खास रिच प्लम केक, वाइन केक, रम केक, मार्झीपॅन स्वीट, ग्वाआ चीज यांच्यासह रम बॉल तयार करण्यात येतात.

रिच प्लम केक हा पूर्णपणे सुक्‍यामेव्यापासून तयार करण्यात येतो. काजू, किसमिस, अक्रोड, टूटी फ्रुटी यांचा भरपूर वापर होतो. संत्र्याचे साल साखरेच्या पाकामध्ये उकळून ते या केकवर बसवले जाते, त्यामुळे केकला वेगळीच चव येते. मार्झीपॅन केक हा नाताळसाठी तयार करण्यात येत असलेला दुसरा महत्त्वाचा प्रकार. त्यातही प्रामुख्याने सुक्‍यामेव्याचा वापर होतो. त्यात प्रामुख्याने बदामाची पेस्ट आणि साखरेचा पाक असतो. या केकला वेगवेगळ्या प्रकारची चव यावी यासाठी आंबा, स्ट्रॉबेरी, पेरू, कैरी, जांभूळ यांच्या रसाचा वापर करण्यात येतो. 

१०० ग्रॅमला ७० ते ८० रुपये या दराने या केकची विक्री करण्यात येते. शक्‍यतो सर्व प्रकारच्या चवीच्या बॉक्‍सला पसंती दिली जाते. वाइन केक, रम केकसह शुद्ध शाकाहारींसाठी अंड्याचा वापर न करता तयार केलेले केकही बेकऱ्यांमध्ये उपलब्ध असतात.

‘ग्वावा चीज’ही लोकप्रिय
ख्रिश्‍चन बांधवांची आवड निवड लक्षात घेऊन केकचे विविध प्रकार तयार करण्यात येतात. त्यात ग्वावा चीज हा जास्त लोकप्रिय प्रकार आहे. हा केक तयार करताना पेरू साखरेच्या पाकात उकळून तयार केलेल्या जेलीचा वापर करण्यात येतो. यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे नाताळ आणि ईस्टर या सणांच्या वेळीच हा केक तयार करण्यात येतो. १०० रुपयांना २०० ग्रॅम या दराने त्याची विक्री करण्यात येते.

Web Title: pune news Christmas

टॅग्स