नियोजन प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग हवा - किरण गित्ते

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

पुणे - 'पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणासारख्या (पीएमआरडीए) संस्था नियोजन करीत असताना, नागरिकांच्या सहभागाची आवश्‍यकता आहे. "सिटिझन्स पीएमआरडीए'सारखा अभ्यास गट त्यासाठी उपयुक्त असून, अशा गटांची संख्या वाढली पाहिजे, असे प्रतिपादन "पीएमआरडीए'चे आयुक्त किरण गित्ते यांनी रविवारी येथे केले.

पुणे - 'पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणासारख्या (पीएमआरडीए) संस्था नियोजन करीत असताना, नागरिकांच्या सहभागाची आवश्‍यकता आहे. "सिटिझन्स पीएमआरडीए'सारखा अभ्यास गट त्यासाठी उपयुक्त असून, अशा गटांची संख्या वाढली पाहिजे, असे प्रतिपादन "पीएमआरडीए'चे आयुक्त किरण गित्ते यांनी रविवारी येथे केले.

पुणे महानगराची सद्यःस्थिती, समस्या आणि उपाययोजना, यावर आधारित "सिटिझन्स पीएमआरडीए' गटाने आयोजित केलेल्या "व्हिजन पुणे 2060' या दोन दिवसांच्या कार्यक्रमात गित्ते बोलत होते. गटाचे विनय हर्डीकर, नितांत माटे, हेमंत साठ्ये या प्रसंगी उपस्थित होते. "पीएमआरडीए'कडून विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

तसेच परवडणारी घरे, रिंग रोड, नगररचना योजना आदींबद्दलही काही प्रयत्न सुरू असून, त्याची माहिती गित्ते यांनी दिली. ते म्हणाले, 'शासकीय संस्था त्यांच्या पद्धतीने काम करीत असतात. परंतु, अनेकदा नागरिकांचा प्रतिसाद आणि सहभाग मिळत नाही. त्यामुळे त्या योजना किंवा विकासकामे उपयुक्त आहेत का, याबद्दल साशंकता राहते. त्यामुळेच "पीएमआरडीए'ने नागरिकांच्या प्रतिनिधींच्या सूचना दैनंदिन कामकाजात मिळतील, यासाठी "प्रकल्प व्यवस्थापन विभाग' कार्यान्वित केला आहे.''

कोणत्याही विकास प्रक्रियेत लोकसहभाग महत्त्वाचा असतो, असेही त्यांनी सांगितले. गटाचे सदस्य अनंत अभंग यांनी विकेंद्रित शहरीकरण, या विषयावर सादरीकरण करताना, जिल्ह्यात चाकण, वाघोली, वडगाव- तळेगाव, शिरूर- राजगुरुनगर, बारामती, दौंड- कुरकुंभ आणि शिरवळ येथे महापालिका व्हायला पाहिजे, असा विचार मांडला. त्यातून समतोल आणि सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य होईल आणि विकासाची नवी केंद्रे उदयाला येतील, असे त्यांनी सांगितले. शशिकांत लिमये यांनी शाश्‍वत वाहतुकीच्या पर्यायांचा आढावा घेताना मेट्रोचे जाळे विस्तारण्याची गरज व्यक्त केली, तसेच पुणे जिल्ह्यातही रेल्वेचे नवे मार्ग निर्माण होऊ शकतात, असे सांगितले. रेल्वेचे बायपास निर्माण झाले, तर पुण्यावरील ताण कमी होईल आणि प्रवाशांनाही अधिक सुविधा मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. समीर शास्त्री यांनी सांडपाणी व्यवस्थापन आणि पाण्याचा प्रश्‍न याबाबत सादरीकरण केले.

निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवे तंत्रज्ञान उपलब्ध झाले असून, त्याचा वापर करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. नितांत माटे यांनी कचरा, सांडपाणी व्यवस्थापन करताना त्यातूनही वीजनिर्मिती शक्‍य आहे, असे स्पष्ट केले. भविष्यातील ऊर्जेची वाढती गरज लक्षात घेता ऊर्जानिर्मितीच्या बहुविध पर्यायांचा वापर केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. विनय हर्डीकर यांनी आभार मानले.

मेट्रोचे अजून आठ मार्ग
मेट्रोचे एक किंवा दोन मार्ग झाले म्हणजे वाहतुकीची कोंडी सुटेल अशा भ्रमात आम्ही नाही, तर "पीएमआरडीए'ने मेट्रोचे 8 मार्ग सुचविले आहेत. मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा उद्देश आहे. तसेच बाणेर, म्हाळुंगेमार्गे हिंजवडीसाठी पर्यायी रस्त्याचे काम सुरू आहे, असेही गित्ते यांनी स्पष्ट केले.

Web Title: pune news Citizens will participate in the planning process