पार्किंग ठरवते शहरी रस्त्यांचे ‘स्वास्थ्य’ - डॉ. पॉल बार्टर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

पुणे - ‘‘शहराच्या व्यवस्थापनाचा एक अविभाज्य भाग म्हणजे पार्किंग आहे. योग्य पद्धतीने वा अयोग्य पद्धतीने केलेले पार्किंग अप्रत्यक्षपणे शहरी रस्त्यांचे ‘स्वास्थ्य’च ठरवत असते. आपण रस्त्यांवर येणाऱ्या वाहनांचा जेवढा विचार करतो, तेवढा पार्किंगचा करत नाही. त्यामुळे पार्किंगचे सुयोग्य व्यवस्थापन केल्यास वाहतूक कोंडीवरही उपाय निघू शकतात हे लक्षात घ्यायला हवे,’’ असे मत आंतरराष्ट्रीय पार्किंग धोरण व व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. पॉल बार्टर यांनी व्यक्त केले.

शहरातील पार्किंगव्यवस्था, समस्या आणि धोरणासंदर्भात विचारविनिमय करण्याच्या उद्देशाने महापालिका, ‘इन्स्टिट्यूट फॉर ट्रार्न्स्पोटेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी’ (आयटीडीपी) आणि वाहतूक पोलिसांच्या वतीने आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी बुधवारी बार्टर बोलत होते. या वेळी महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, ‘आयटीडीपी’च्या प्रांजली देशपांडे-आगाशे आदी उपस्थित होते.

बार्टर म्हणाले, ‘‘शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी पुरेशा जागेपेक्षा पार्किंगचे सुयोग्य व्यवस्थापन महत्त्वाचे ठरणार असून, त्यामुळे उपलब्ध पार्किंगव्यवस्थेची कार्यक्षमता वाढेल. मध्यवर्ती पार्किंगव्यवस्था उभारण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. मुख्य म्हणजे यासाठी नागरिकांनी शुल्काच्या रूपात पैसे देण्याचीही तयारी ठेवावी. रस्त्यालगतच्या पार्किंगचे नियोजन केल्यास पादचारी आणि वाहनांच्या वाहतुकीसाठी पुरेसा रस्ता उपलब्ध करता येऊ शकेल. त्यातून सुरक्षित वाहतूकव्यवस्था निर्माण होईल.’’ 

कुणाल कुमार म्हणाले, ‘‘शहरासाठी पार्किंग हा महत्त्वाचा विषय आहे. वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे पार्किंग व्यवस्थापन अधिक आवश्‍यक ठरते. सार्वजनिक वाहतूकव्यवस्था आणि पार्किंग धोरण एकत्रच ठरवायला हवे.’’

पार्किंग मोठी म्हणजे चांगली, असे नाही
बार्टर म्हणाले, ‘‘पार्किंगसाठी मागणीच्या हिशेबाने जागा उपलब्ध करून देणे आवश्‍यक ठरते. तिथे ‘मागणी तसा पुरवठा’ हा वैज्ञानिक आधार महत्त्वाचा ठरतो. केवळ जास्त आणि मोठी पार्किंग म्हणजे चांगली पार्किंग, हे गृहीतक चुकीचे आहे. एखाद्या भागात लोकसंख्येची घनता आणि प्रामुख्याने सार्वजनिक वाहतूक साधने वापरणाऱ्या नागरिकांची संख्या कशी आहे, यावरही हे ठरत असते.’’

Web Title: pune news city road health depend on parking