अपघाती मृत्यूचा दावा आठ महिन्यांत निकाली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

लोकन्यायालयात तडजोड; मृताच्या कुटुंबीयांना साडेनऊ लाख भरपाई

पुणे - नुकसानभरपाई मिळविण्यासाठी दाखल केलेला दावा लोकन्यायालयात आठ महिन्यांतच निकाली निघाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सुमारे साडेनऊ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय लोकन्यायालयात झाला. अशा प्रकारे मोटार अपघात न्यायाधिकरणाकडील काही दाव्यांत लोकन्यायालयामध्ये तडजोड झाली. 

लोकन्यायालयात तडजोड; मृताच्या कुटुंबीयांना साडेनऊ लाख भरपाई

पुणे - नुकसानभरपाई मिळविण्यासाठी दाखल केलेला दावा लोकन्यायालयात आठ महिन्यांतच निकाली निघाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सुमारे साडेनऊ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय लोकन्यायालयात झाला. अशा प्रकारे मोटार अपघात न्यायाधिकरणाकडील काही दाव्यांत लोकन्यायालयामध्ये तडजोड झाली. 

मोटार स्वच्छ करण्याचे काम करणारे प्रकाश बनसोडे यांचे नोव्हेंबर २०१६ मध्ये अपघाती निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी अकरा लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मोटार अपघात न्यायाधिकरणाकडे केली होती. वाहनचालक आणि वाहनाचा विमा उतरविलेल्या दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात त्यांनी दावा दाखल केला होता. शनिवारी झालेल्या लोकन्यायालयात या दाव्यामध्ये तडजोड झाली. ॲड. सी. डी. अय्यर, ॲड. अनिल पटणी आणि ॲड. आशिष पटणी यांनी तडजोडीसाठी प्रयत्न केले. 

अपंगत्व आलेल्या तरुणाला नुकसान भरपाई 
मित्राच्या दुचाकीवरून सोरतापवाडी येथे जाताना झालेल्या अपघातात अपंगत्व आलेल्या दिलीप मेमाणे या तरुणाला साडेआठ लाख रुपये देण्याचा निर्णय लोकन्यायालयात झाला. नुकसान भरपाईसाठी मेमाणे यांनी दाखल केलेला दावा वर्षाच्या आतच निकाली निघाला. पुणे- सोलापूर रस्त्यावर मेमाणे यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने ते जबर जखमी झाले होते. त्यांना दरमहा १४ हजार रुपये पगार मिळत होता. त्याआधारे त्यांनी दहा लाख रुपये नुकसानभरपाईचा दावा दाखल केला होता.
 
तब्बल ४१ लाखांची भरपाई 
रेल्वेच्या घाट विभागाच्या इनचार्जच्या अपघाती मृत्यूप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांना ४१ लाख ५० हजार नुकसानभरपाई दिली जाणार आहे. प्रबोधनकुमार जैन हे मे २०१६ मध्ये पत्नीसह दुचाकीवरून जात होते. मुंबई- पुणे रस्त्यावर लोणावळा येथे त्यांच्या दुचाकीला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने जैन यांचा मृत्यू झाला होता. त्यांची पत्नी आणि मुलीने नुकसानभरपाईसाठी ॲड. भास्कर सूर्यवंशी यांच्यामार्फत न्यायाधिकरणात रॉयल सुंदर जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात दावा दाखल केला होता. तो तडजोडीत निघाला.

वेल्डरच्या कुटुंबीयांना मिळणार २१ लाख रुपये 
बांधकामाच्या ठिकाणी वेल्डर म्हणून काम करीत असलेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांना २१ लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. वेल्डरचे काम करणारे चंद्रकांत कांबळे यांच्या अंगावरून टॅंकर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. हा अपघात खराडी येथील एका बांधकामाच्या ठिकाणी घडला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी न्यायाधिकरणाकडे दाखल केलेला नुकसानभरपाईचा दावा तडजोडीने मिटविला गेला. या दाव्यात कांबळे यांचे वकील भास्कर सूर्यवंशी आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीच्या वतीने ॲड. हृषीकेश गानू यांनी तडजोड घडविली.

Web Title: pune news Claim of accidental death in eight months