"ऑक्‍टोबर हीट'चा चटका कमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

शहराच्या मध्य वस्तीसह रेल्वे स्थानक, हडपसर, कात्रज, सिंहगड रस्ता, कोथरूड या भागात जोरदार सरी पडल्या. काही मिनिटांमध्ये पडलेल्या या पावसाने रस्त्यांवर पाणी साचले. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. ऑक्‍टोबरच्या सुरवातीला असलेला उन्हाचा चटका या पावसामुळे कमी झाला आहे. त्यामुळे या महिन्याच्या मध्यावधीपर्यंत "ऑक्‍टोबर हीट'ची नोंद झाली नसल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली

पुणे - शहरात तीन दिवस सलग पडणाऱ्या पावसामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली उतरला आहे. त्यामुळे या महिन्याच्या सुरवातीला जाणवलेला "ऑक्‍टोबर हीट'चा चटका कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले आहे. सोमवारी (ता. 15) शहर आणि परिसरात काही भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शहरात शुक्रवारी (ता. 13) दुपारी अवघ्या 90 मिनिटांमध्ये 101 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात सातत्याने पावसाच्या सरी पडत आहेत. रविवारी सकाळी शहरात ऊन पडले होते. दुपारनंतर आकाशात ढग दाटून आले. त्यामुळे दुपारी अडीचच्या सुमारास संध्याकाळप्रमाणे आकाश अंधारून आले होते. त्यानंतर पावसाला सुरवात झाली. शहराच्या मध्य वस्तीसह रेल्वे स्थानक, हडपसर, कात्रज, सिंहगड रस्ता, कोथरूड या भागात जोरदार सरी पडल्या. काही मिनिटांमध्ये पडलेल्या या पावसाने रस्त्यांवर पाणी साचले. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. ऑक्‍टोबरच्या सुरवातीला असलेला उन्हाचा चटका या पावसामुळे कमी झाला आहे.

त्यामुळे या महिन्याच्या मध्यावधीपर्यंत "ऑक्‍टोबर हीट'ची नोंद झाली नसल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. सध्या कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमी नोंदला जात आहे. पुढील दोन ते तीन दिवस हवामान याच प्रमाणे राहील, असा अंदाजही व्यक्त केला आहे.

पावसाचा अंदाज
16 ऑक्‍टोबर ः काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्‍यता
17 ते 20 ऑक्‍टोबर ः आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता

Web Title: pune news: climate rain october heat