नारळाला आला ‘भाव’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

पुणे - कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांतील उत्पादन घटल्याने सध्या पुण्यातील नारळाची उलाढाल आंध्र प्रदेशातील उत्पादनावर अवलंबून आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ३० ते ४० टक्‍क्‍यांनी नारळाचे भाव अधिक आहेत. सणांचा कालावधी असल्याने नारळांना मागणीही कायम राहणार आहे.

पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून नारळांची आवक होते. केरळमध्ये नारळाचे उत्पादन जास्त आहे. मात्र, तेथील बाजारपेठेत आणि इतर प्रक्रिया पदार्थ तयार करण्यासाठी तेथील उत्पादन खर्ची पडते. इतर उत्पादक राज्यांच्या तुलनेत केरळमधील नारळ मुंबईमध्ये विक्रीला पाठविला जातो. पुण्याच्या बाजारपेठेत कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून नारळाची आवक होते. नारळाचे उत्पादन पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असते. पावसाचे पाणी अधिक मिळाले तरच त्याला चांगली फळधारणा होते. तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कमी पाऊस झाल्याने तेथील नारळाचे उत्पादन कमी झाले. आंध्र प्रदेशात मात्र उत्पादन चांगले झाल्याने बाजारपेठेत नारळाचा पुरवठा चांगला राहिला आहे, असे व्यापारी दीपक बोरा यांनी सांगितले.

यंदा नारळाचे भाव गेल्यावर्षीपेक्षा अधिक राहतील, अशी स्थिती दिसत आहे. उत्पादन कमी झाल्याने कर्नाटकातील आरसीकेरी, दावणगिरीमध्ये, तर तमिळनाडूतील मदुराई, वाणीअंबाडी बाजारपेठांत नारळाचे भाव वधारले आहेत. उत्पादन क्षेत्रातच भाव वाढल्याने इतरत्रही नारळाचे भाव वधारले आहेत. आंध्र प्रदेशातील पालकोल, केसनपल्ली, लक्कावरम आदी बाजारपेठांतील मागणी वाढल्याने तेथील भाव वधारल्याचा परिणाम येथील भावावर झाला आहे.

Web Title: pune news coconut