आणखी दोन दिवस गारठा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

पुणे - मकरसंक्रांतीच्या दरम्यान काढता पाय घेत असलेली थंडी शहरात पुन्हा रेंगाळली आहे. किमान तापमानाचा पारा पुन्हा सरासरीपेक्षा खाली गेला असून, पुढील दोन ते तीन दिवस संध्याकाळनंतर हवेत गारठा राहील, असा अंदाज हवामान खात्याने रविवारी वर्तविला. दरम्यान, राज्यात सर्वांत कमी तापमान ब्रह्मपुरी येथे ९.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले, तर पुण्यात किमान तापमानाचा पारा १०.९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरला आहे. 

मालदीव आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या आठवड्यात पुणे शहरासह परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मकरसंक्रांतीच्या दरम्यान किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा सहा ते सात अंश सेल्सिअसने वाढला होता. सूर्याच्या उत्तरायणाला सुरवात झाल्यानंतर उत्तर गोलार्धातील तापमान वाढायला सुरवात होते. त्यामुळे थंडी आता काढता पाय घेत असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले होते.

मात्र, याच दरम्यान कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कमी झाला. त्यामुळे आकाश निरभ्र झाले. उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने सूर्यास्तानंतर हवेत गारठा जाणवत आहे. त्यातून किमान तापमानाचा पाराही सरासरीपेक्षा कमी झाला आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. पुढील दोन दिवसांमध्ये शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा ११ ते १३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील दोन दिवस या भागातील थंडी कायम राहील, असेही सांगण्यात आले. 

Web Title: pune news cold