शहर परिसरामध्ये थंडीचा कडाका वाढणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

पुणे - शहर आणि परिसरात या आठवड्यात थंडीचा कडाका वाढण्याचे संकेत हवामान खात्याने रविवारी दिले. आज सकाळी साडेआठपर्यंत 13.5 अंश सेल्सिअस असलेला किमान तापमानाचा पारा पुढील सहा दिवसांमध्ये 11 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असेही हवामान तज्ज्ञांनी सांगितले. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे 12.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले.

महाराष्ट्राच्या काही भागांत कमी दाबाचा पट्टा असल्याने शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वाढलेला होता. रविवारी सकाळपर्यंत किमान तापमानात 2.6 अंश सेल्सिअसची वाढ झाली. कमी दाबाचा प्रभाव पुढील दोन दिवसांमध्ये ओसरणार असल्याने सध्या अंशतः ढगाळ असलेले आकाश निरभ्र होईल. त्याचा परिणाम म्हणून थंडीचा कडाका पुन्हा वाढेल, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, हरियाना, चंडीगड, दिल्ली, पंजाब, राजस्थान येथील काही भागांत थंडीची लाट आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले. कोकण आणि मराठवाड्यातील किमान तापमानात अंशतः वाढ झाली. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये या भागातील किमान तापमानाचा पारा सरासरीपर्यंत खाली उतरेल, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

Web Title: pune news cold increase