‘व्हर्च्युअल’पेक्षा हवा ‘ॲक्‍च्युअल’ संवाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

पुणे - ‘‘व्हॉट्‌सॲप, फेसबुक या आभासी माध्यमांतून मित्र- मैत्रिणींच्या संपर्कात राहण्याबरोबरच प्रत्यक्ष भेटून मनमोकळा संवाद साधणे आणि घाम येईपर्यंत मैदानावर खेळणे यातून सकारात्मकता वाढेल. त्यामुळे आत्महत्येसारखे नकारात्मक विचार निश्‍चित मागे पडतील,’’ असा विश्‍वास बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मानसोपचार विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. मनजित संत्रे यांनी व्यक्त केला. 

पुणे - ‘‘व्हॉट्‌सॲप, फेसबुक या आभासी माध्यमांतून मित्र- मैत्रिणींच्या संपर्कात राहण्याबरोबरच प्रत्यक्ष भेटून मनमोकळा संवाद साधणे आणि घाम येईपर्यंत मैदानावर खेळणे यातून सकारात्मकता वाढेल. त्यामुळे आत्महत्येसारखे नकारात्मक विचार निश्‍चित मागे पडतील,’’ असा विश्‍वास बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मानसोपचार विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. मनजित संत्रे यांनी व्यक्त केला. 

तरुणांमधील आत्महत्या हा राज्यातील काळजीचा विषय झाला आहे. स्मार्ट फोन हातात आल्याने शाळा आणि महाविद्यालयीन मुले एकलकोंडी होत आहेत. प्रत्यक्ष भेटून मनसोक्त बोलण्याऐवजी फेसबुक, व्हॉट्‌सॲप या माध्यमातून आभासी संवाद साधला जात आहे. त्यातून नैराश्‍य येऊन आत्महत्येसारखे टोकाचे विचार मुला- मुलींच्या मनात डोकावत आहेत. त्याबद्दल डॉ. संत्रे यांच्याशी ‘आठवड्याच्या मुलाखती’च्या निमित्ताने संवाद साधण्यात आला. या वेळी त्यांनी हा विश्‍वास व्यक्त केला.

डॉ. संत्रे म्हणाले, ‘‘जगभरामध्ये सुमारे दहा लाख लोक आत्महत्या करतात. त्यांत तरुणांचे प्रमाण मोठे आहे. पण, आत्महत्या हे कोणत्याच समस्येचे उत्तर नाही. समस्येपासून पळून जाण्याने समस्या सुटत नाही, ती सोडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असा विश्‍वास मुलांमध्ये निर्माण केला पाहिजे.’’ किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक बदल होत असतात. त्याच वेळी भावनिक गुंता वाढत असतो. करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर तो विद्यार्थी असतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू पुढे येत असतात. अशा वेळी मुलांना मदतीची गरज असते. शाळा, मित्र आणि पालक यांच्यावर ही मदत पुरविण्याची खऱ्या अर्थाने जबाबदारी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, ‘‘तंत्रज्ञान हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे आता सकारात्मकतेने अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे. व्हॉट्‌सॲप, फेसबुक यात तरुणांचा जास्त वेळ जातो. मित्रांना प्रत्यक्ष भेटणे, त्यांच्याशी समोरासमोर बोलणे होत नाही, हे चित्र बदलले पाहिजे.’’

पालकांबद्दल बोलताना डॉ. संत्रे म्हणाले, ‘‘पालक हे मुलांचे सर्वोत्तम समुपदेशक होऊ शकतात. पालक हे मुलांबरोबर दिवस- रात्र असतात. त्यांच्यातील शारीरिक, मानसिक बदल ते बारकाईने बघत असतात. त्यानुसार त्यांनी मुलांचे समुपदेशन केले पाहिजे. आपल्या अपेक्षा पाल्यावर थोपवण्यापेक्षा त्याची काय आवड आहे, हे पालकांनी जाणून घेणे, ही आताच्या काळाची गरज आहे. केवळ मुलाच्या हातातून मोबाईल काढून घेणे, हे त्यावरचे उत्तर असू शकत नाही. मोबाईलचा वापर कशासाठी केला पाहिजे, हे निश्‍चित करून पालकांनी त्यानुसार मर्यादा घालणे आवश्‍यक आहे.’’ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक आणि विकासासाठी झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: pune news communication