‘कॅशलेस’ला संमिश्र प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याच्या गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या निर्णयानंतर नागरिकांनी रोकडविरहित (कॅशलेस) व्यवहारांना प्राधान्य दिले होते. मात्र सहा महिन्यानंतरही कॅशलेस व्यवहारांना संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. नव्या पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात पुरेशा प्रमाणात आल्यामुळे नागरिक पुन्हा रोख व्यवहारांकडे वळत आहेत. 

नोटाबंदीच्या घोषणेनंतर शहरातील फर्ग्युसन रस्ता संपूर्णपणे कॅशलेस करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या रस्त्यावरील मोठी व प्रमुख दुकाने, हॉटेल्स पूर्वीपासूनच कार्ड व मोबाईल पेमेंट स्वीकारत होती. रस्त्यावर व्यवसाय करणारे छोटे विक्रेते हे पूर्णपणे रोख व्यवहारांवर अवलंबून होते. हे चित्र अद्यापही बदललेले नाही. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘डिजिधन मेळाव्यां’चे प्रमाणही कमी होते.

कॅशलेस व्यवहारांतील अडथळे 
कार्डद्वारे व्यवहारांवर दुकानदारांकडून दोन टक्के अतिरिक्त शुल्क आकारणी 

पेमेंट ॲप्लिकेशन वापरण्यासाठी सक्षम इंटरनेट सेवा सर्वत्र नाही 

कार्ड, पेमेंट वॉलेट वापराबद्दल नागरिकांच्या मनातील भीती कायम 

व्यावसायिकांकडून रोकडसाठी ग्राहकांची जाणीवपूर्वक अडवणूक

विशिष्ट रकमेपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी कॅशलेस सुविधा

नोव्हेंबर, डिसेंबर या सुरवातीच्या दोन महिन्यांमध्ये चलनतुटवडा मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे डेबिट कार्डच्या माध्यमातूनच खरेदी करण्याची सवय लागली होती. त्यानंतर मात्र तुटवड्याची परिस्थिती निवळल्यामुळे काही ठिकाणी पुन्हा रोख व्यवहार करू लागलो. पेट्रोल पंपावर कार्ड स्वाइप करण्यासाठी खूप वेळ लागत असल्यामुळे पुन्हा रोख पैसे देण्यास प्राधान्य देत आहोत.
- अनुराधा मोरे, नोकरदार 

माझ्याकडे येणाऱ्या ग्राहकांकडे कार्ड असले, तरी ते स्वीकारण्यासाठीचे यंत्र आणि बॅंक खाते माझ्याकडे नाही. त्यामुळे आम्ही रोखीनेच व्यवहार करतो. सुरवातीच्या काळात जशी अडचण झाली, तशी मात्र आता होत नाही. आता लोकांकडे नोटा असल्यामुळे आम्हाला व्यवसाय करणे सोपे झाले आहे.
- मोहंमद खान, विक्रेता 

Web Title: pune news composite response for cashless