कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

पुणे - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजयाचा वारू रोखण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस मोर्चेबांधणी करीत असले, तरी नेतृत्वाकडून निवडणुकांच्या तयारीबाबत निरोप नसल्याने इच्छुक अस्वस्थ झाले आहेत. "भाजपला हरविण्यासाठी प्रचंड ताकदीनिशी सामोरे जावे लागेल, त्यामुळे आम्हाला वेळही हवा आहे. तशा हालचाली का केल्या जात नाहीत?, ' अशी विचारणा इच्छुकांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. इच्छुकांच्या या पवित्र्यामुळे दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांपुढील डोकेदुखी वाढल्याचे दिसून येत आहे.

भाजपने मात्र राज्यातील निवडणुका पुन्हा जिंकण्याच्या उद्देशाने आतापासून हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्‍वभूमीवर समविचारी पक्षांची मोट बांधून भाजपला हरविण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा इरादा आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत आघाडीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने राज्यात दोन्ही कॉंग्रेसकडून एकत्र निवडणुका लढण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे.

विधनसभेच्या मागील निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेस स्वतंत्रपणे लढल्याने भाजप-शिवसेनेला फायदा झाला. तरीही काही मतदारसंघांत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. ज्या मतदारसंघात चांगली मते मिळाली आहेत, तेथील उमेदवारांना पक्षाने ताकद देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. ज्या मतदारसंघात अपेक्षित मते मिळाली नाहीत, तेथील जागा मित्र पक्षांना सोडण्याचा सल्लाही दिला आहे. कॉंग्रेसमधील इच्छुकांनीही त्यांच्या नेत्यांकडे "फिल्डिंग' लावली आहे. त्यांनीही निवडणुकीची तयारी करण्यासाठी लवकर निर्णय घेण्याबाबत नेत्यांना विनंती केली आहे.

'मतदारसंघातील सक्षम उमेदवारांना निवडणुकीची मोठी तयारी करायची असते. त्यासाठी पुरेसा वेळ आहे. त्यासाठी पक्षाने आतापासून प्रोत्साहन दिले पाहिजे. ज्याचा निवडणुकीत फायदा होईल.''
-अशोक पवार, माजी आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस

'कॉंग्रेस निवडणुकांची तयारी करीत आहे. मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवारांना आता पुन्हा तयारीची सूचना करणे अपेक्षित आहे.''
- रमेश बागवे, शहराध्यक्ष, कॉंग्रेस

Web Title: pune news congress ncp leader politics