कामगारांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणाच 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

पुणे - सिंहगड रस्ता येथील इमारतीवरून पडून तीन कामगारांच्या मृत्यूनंतर बालेवाडी परिसरातील प्राइड पर्पल इमारतीच्या दुर्घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. बालेवाडी परिसरात 29 जुलै 2016 रोजी प्राइड पर्पलच्या पार्क एक्‍स्प्रेस इमारतीचा स्लॅब कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटना तसेच बांधकाम मजुरांच्या मृत्यूच्या घटनांवरून काही बांधकाम व्यावसायिक आणि संबंधित ठेकेदारांकडून कामगारांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणाच होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. 

बालेवाडी परिसरातील पार्क एक्‍स्प्रेस इमारतीच्या 14 व्या मजल्यावर स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास स्लॅब कोसळून नऊ मजुरांचा मृत्यू झाला होता. त्या ठिकाणी बारा मजली इमारत उभारण्यास महापालिकेने परवानगी दिली होती; परंतु 14 व्या मजल्याच्या स्लॅबचे काम सुरू होते. महापालिकेने त्यांना नोटीस पाठवली; परंतु दोन मजल्यांच्या परवानगीबाबतचा तपास कोठपर्यंत आला, हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी अकरा जणांविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरणे, महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्‌स ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल केला. चतुःशृंगी पोलिसांनी आर्किटेक्‍टसह पाच जणांना अटक केली. उर्वरित सहा बांधकाम व्यावसायिकांना अटक करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. दरम्यान, चतुःशृंगी पोलिसांनी तपास पूर्ण करून या सर्व 11 आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. 

कोसुंबीकर या इमारतीचेही आर्किटेक्‍ट 
बालेवाडीच्या दुर्घटनेनंतर संबंधित बिल्डर, आर्किटेक्‍टसह स्ट्रक्‍चरल इंजिनिअर यांची महापालिकेकडील नोंदणी रद्द करण्यात आली होती. त्या सर्वांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले होते. बालेवाडी दुर्घटनेप्रकरणी प्राइड पर्पल प्रॉपर्टीजचे भागीदार आणि विकसक, आर्किटेक्‍ट आयडिया अँड इमेजेसचे प्रदीप कोसुंबीकर आणि स्ट्रक्‍चरल इंजिनिअर यांची महापालिकेकडील नोंदणी रद्द करण्यात आली होती. त्यांच्या बांधकाम प्रस्तावांना महापालिका परवानगी देणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे कोसुंबीकर सिंहगड रस्त्यावरील या इमारतीचे आर्किटेक्‍ट असल्याचे समोर आले आहे. 

जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी 
बांधकाम सुरू असताना कामगारांचा मृत्यू होण्याच्या घटना शहरात घडत आहेत. महिन्यातून अशा स्वरूपाच्या दोन-तीन घटना होत आहेत. एखाद्या कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. पोलिस ठाण्यात ठेकेदाराविरुद्ध हलगर्जीपणा आणि मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल गुन्हा दाखल केला जातो. विकसक, संबंधित ठेकेदार, आर्किटेक्‍ट आणि स्ट्रक्‍चरल इंजिनिअर यांची जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी, तसेच, बांधकाम मजुरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

Web Title: pune news construction labour