अवैध धंद्यावर जरब; मात्र घरफोड्यांत वाढ

अनिल सावळे
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून, सोनसाखळी चोरट्यांनीही पुन्हा तोंड वर काढण्यास सुरवात केली आहे. अवैध धंद्यांवर जरब बसविण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश आले आहे. मात्र घरफोड्या आणि सोनसाखळी चोरट्यांना रोखणे शक्‍य झालेले नाही. गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण घटले असून, त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून, सोनसाखळी चोरट्यांनीही पुन्हा तोंड वर काढण्यास सुरवात केली आहे. अवैध धंद्यांवर जरब बसविण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश आले आहे. मात्र घरफोड्या आणि सोनसाखळी चोरट्यांना रोखणे शक्‍य झालेले नाही. गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण घटले असून, त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या प्रभात रस्ता आणि कर्वे रस्त्यावर सोनसाखळी चोरट्यांनी तिघांना लुबाडल्याची घटना नुकतीच घडली. चोरट्यांनी दुचाकीवर जाणाऱ्या संदीप दहिभाते या दांपत्याला अडवून सोन्याची चेन आणि पत्नीचे मंगळसूत्र, कानातील दागिने जोरात हिसका मारून नेले. गणेश गोसावी यांचीही सोन्याची चेन हिसकावून नेली. गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. 

बिबवेवाडी येथील वक्रतुंड सोसायटीमधील श्रीकृष्ण देशमुख या ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांच्या घरातून रोकड आणि चक्‍क गॅस सिलिंडर चोरीला गेली. रुक्‍मिणी बिल्डिंगमधील उत्तम शिंदे, मेधा प्रकाश जोगळेकर, रामचंद्र विठ्ठल सगर, तसेच तोडकर रेसिडेन्सीमधील अलोश विनोद सोलंकी, श्रेयस बिदरकर यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न झाला. कोंढवा खुर्द येथील संत ज्ञानेश्‍वर नगरात षन्मुख रावळ आणि त्यांचे शेजारच्या फ्लॅटमधील सचिन त्रिवेदी यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न झाला.

कोथरूड येथील पौड रस्त्यावरील नीलेश पवळे यांच्या पर्पल टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयातून चोरट्यांनी ७० हजारांची रोकड लंपास केली. आयडियल कॉलनीतील अनुश्री अपार्टमेंटमधील सागर काणेकर यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर सोन्याचे दागिने आणि चांदीची भांडी चोरून नेली. त्याच सोसायटीमधील वंदना गोडबोले यांच्या घरीही चोरीचा प्रयत्न झाला.

दुसरीकडे पोलिसांना काही गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले. मात्र, घडणाऱ्या घटनांच्या तुलनेत हे प्रमाण फारच कमी आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने घरफोडी करणाऱ्या बंटी-बबलीच्या जोडीला गेल्या आठवड्यात अटक केली. आरोपी आकाश हेमराज परदेशी आणि उषा राम कांबळे या जोडीसह अनिल काशिनाथ लष्करे यांच्याकडून विमानतळ, विश्रांतवाडी, निगडी, विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पावणेसहा लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला.

भारती विद्यापीठ पोलिसांनी अक्षय बापू खंडाळे या सराईत चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून सुमारे दोन लाखांचा ऐवज जप्त केला. या काही बोटावर मोजण्याइतक्‍या घटना वगळता पोलिसांना फारसे यश मिळाल्याचे दिसून येत नाही.

शहरालगतच्या भागात गस्त वाढवा
पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीतील शहरालगतच्या भागात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. वारजे माळवाडी, उंड्री, पिसोळी, कात्रज, आंबेगाव या परिसरात नागरिकांना रात्रीच्या वेळी रस्त्यावर लुबाडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या भागात पोलिस गस्त वाढविण्याची गरज आहे.

पाचशेहून अधिक घरफोड्या
गतवर्षी २०१६ मध्ये शहर पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीत एक हजार १३४ घरफोड्या झाल्या होत्या. त्यातील ३५९ घटना या भरदिवसा झाल्या; तर ७७५ घरफोड्या रात्री झाल्या. गतवर्षीच्या एकूण घरफोड्यांपैकी ५३१ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. चालू वर्षात २०१७ मध्ये ऑगस्टअखेर पाचशेहून अधिक ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. त्यापैकी दोनशेच्या आसपास गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Web Title: pune news control on illegal business