नागरिकांच्या पैशाने नगरसेवक जाणार माउंट अबूला !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

पुणे - महापालिकेचा कारभार कसा करावा, याचे धडे गिरविण्यासाठी नगरसेवकांचे राजस्थानातील माउंट अबूला दोन दिवस जाण्याचे घाटत आहे. स्वतःला प्रशिक्षण घेण्यासाठी पैसे मात्र नागरिकांच्या खिशातील वापरणार आहेत. विकासकामांतील निधी या "अभ्यास दौऱ्या'साठी वापरण्याचे पदाधिकाऱ्यांचे नियोजन आहे.

पुणे - महापालिकेचा कारभार कसा करावा, याचे धडे गिरविण्यासाठी नगरसेवकांचे राजस्थानातील माउंट अबूला दोन दिवस जाण्याचे घाटत आहे. स्वतःला प्रशिक्षण घेण्यासाठी पैसे मात्र नागरिकांच्या खिशातील वापरणार आहेत. विकासकामांतील निधी या "अभ्यास दौऱ्या'साठी वापरण्याचे पदाधिकाऱ्यांचे नियोजन आहे.

महापालिकेचे नवे सभागृह अस्तित्वात येऊन सहा महिने झाले आहेत. या काळात नगरसेवकांसाठी त्यांच्या-त्यांच्या पक्षातर्फे, महापालिकेतर्फे तसेच काही स्वयंसेवी संस्थांतर्फे महापालिकेच्या कारभाराचे धडे गिरविण्यासाठी प्रशिक्षण वर्ग झाले आहेत. काही नगरसेवकांनी तर, हे धडे आत्मसात करून धडाक्‍या कामालाही सुरवात केली आहे.

नगरसेवकांची नव्याची नवलाई आता आटोपली आहे, असे सध्याचे चित्र आहे. अशातच "ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्न्मेंट' या संस्थेने नगरसेवकांसाठी दोन दिवसांचा प्रशिक्षण वर्ग आयोजित केला आहे. 8 व 9 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या वर्गासाठी जाण्या-येण्याचा खर्च महापालिकेने उचलावा, अशी इच्छा काही गटनेत्यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे व्यक्त केली. त्यानुसार आता नगरसचिवांकडे नावनोंदणीही सुरू झाली आहे. मात्र, महापालिकेच्या 2017-18 च्या अर्थसंकल्पात नगरसेवकांच्या प्रशिक्षणासाठी 72 हजार रुपयांची तरतूद होती. नगरसेवकांसाठी "यशदा'मध्ये काही काळापूर्वी कार्यशाळा झाली होती. त्यासाठी झालेल्या खर्चात ही तरतूद संपून गेली. आता माउंट अबूला जाण्यासाठी पैसे कोणते वापरायचे, असा प्रश्‍न उपस्थित झाला. त्यावर "काहींनी' विकासकामाचे पैसे वर्गीकरण करून वापरण्याचा पर्याय सुचविला. अन्‌ पदाधिकाऱ्यांनीही तो मंजूर केला. त्यामुळे आता नागरिकांच्या पैशावर नगरसेवक माउंट अबूचा दौरा करून कारभाराचे धडे गिरविणार आहेत !!

नागरिकांच्या पैशाने दौरा नको
माउंट अबूचा प्रशिक्षण दौरा नगरसेवकांसाठी आवश्‍यक आहे. परंतु, या दौऱ्याला जाण्यासाठी नगरसेवकांनी स्वतःचा निधी वापरावा. महापालिकेच्या म्हणजेच नागरिकांच्या पैशातून अभ्यास दौरा कशासाठी? त्यामुळे नागरिकांचे पैसे खर्च करून मी या दौऱ्याला जाणार नाही, असे महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राणी भोसले यांनी सांगितले.

Web Title: pune news corporator go to mount abu for study tour