नगरसेवकांना जनजागृतीचा संसर्ग

Pune-Municipal
Pune-Municipal

पुणे - शहरातील आरोग्य व्यवस्था सुधारण्याऐवजी नगरसेवक मात्र संसर्गजन्य रोगांच्या जनजागृतीसाठी लाखो रुपयांची उधळपट्‌टी करीत आहेत.

महापालिकेच्या रुग्णालयांमधील सेवा-सुविधांचा निधी वळवून प्रभागांमध्ये जागृती केली जात आहे. यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असून जनजागृतीसाठी निधीचे वर्गीकरण न करण्याचा अभिप्राय आरोग्य खात्याने देऊनही त्यासाठी लाखो रुपये दिल्याचे स्पष्ट झाले आहे.   

या निधीचा वापर करून जागृती कशी केली जाते, त्याची परिणामकारकता, त्यावर एवढा खर्च करायचा का, यापैकी एकाही प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर ना नगरसेवकांकडे आहे; ना आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांकडे! महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रभाग क्र.११, १२ आणि १७मध्ये आरोग्याविषयक जनजागृतीसाठी ७० लाख रुपये वर्गीकरणाद्वारे दिले आहेत. तसेच गेल्या सहा महिन्यांत इतरा प्रभागांमध्ये अशा प्रकारे कोट्यवधी रुपये वळविले आहेत.

त्यामुळे पुणेकरांच्या आरोग्यापेक्षा जनजागृतीला नगरसेवकांनी पसंती दिल्याचे दिसून येत आहे.

शहरात गेल्या दोन वर्षांत संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने तो रोखण्यासाठी जनजागृतींही केली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र तरतूदही आहे. त्यानुसार २०१७-१८ या वर्षासाठी ५० लाख रुपये तरतूद होती. त्यातून ठेकेदाराच्या माध्यमातून जागृती करण्यात येते. तरीही नगरसेवकांनी या कामांसाठी सहयादीतून वर्गीकरण करून घेतले आहे. 

आरोग्य यंत्रणा कमकुवत 
शहराला आरोग्य प्रमुख नसल्याने ओरड सुरू आहे. महापालिकेची आरोग्य यंत्रणा कमकुवत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यावरून सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी आरोग्य खात्याच्या कारभाराचे वाभाडे काढले आणि खात्याचा कारभार सुधारण्याची मागणी केली. मात्र जनजागृतीचे कारण पुढे करीत पैशांची उधळपट्टी होत असल्याचे दिसून येत आहे. 

जनजागृती मोहीम नेमकी कुणासाठी?
आरोग्य खात्यामार्फत करण्यात येणाऱ्या जनजागृती मोहिमेसाठी ठेकेदाराची नेमणूक केली आहे. मात्र संबंधित ठेकेदारही कागदोपत्री कामे दाखवून बिले घेतल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे संसर्गजन्य रोगांच्या जागृतीची मोहीम नगरसेवक आणि ठेकेदारांच्या भल्यासाठीच आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. यासंदर्भात ठेकेदारांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.  

आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. त्याचाच भाग म्हणून प्रभागांमधील नागरिकांमध्ये जागृती निर्माण केल्यास ती उपयुक्त ठरते. त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद आहे. त्यामुळे निधीच्या वर्गीकरणाचा गरज नाही. त्याबाबतचा अभिप्राय महापालिका आयुक्तांकडे दिला आहे.
 - डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, महापालिका  

या कामांना हवे प्राधान्य 
 हॉस्पिटल, रुग्णालयांतील सेवेची तत्परता वाढविणे
 अधिकारी- कर्मचारी नेमणे
 रुग्णालयांमधील पायाभूत 
सुविधा वाढविणे
 रुग्णाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना 

अशा प्रकारे होते जनजागृती 
 संसर्गजन्य रोग आणि खबरदारीच्या उपायांची माहिती देणे 
 शाळा, महाविद्यालयांत, झोपडपट्टयांमध्ये जागृतीचे कार्यक्रम 
 जागृतीसाठी फलक लावणे, पथनाट्याचे सादरीकरण 
 सोसायट्या, बाजारपेठांमध्ये कार्यक्रम 

आरोग्य जनजागृतीसाठी मूळ तरतूद 
74 लाख 2016-2017
50 लाख 2017-2018

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com