आई-वडिलांमुळे फसला मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

पुणे - झोपलेल्या सहा वर्षांच्या मुलीला पळवून नेणाऱ्याला तिच्या आई-वडिलांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना कोरेगाव पार्क येथे सोमवारी मध्यरात्री घडली. 

पुणे - झोपलेल्या सहा वर्षांच्या मुलीला पळवून नेणाऱ्याला तिच्या आई-वडिलांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना कोरेगाव पार्क येथे सोमवारी मध्यरात्री घडली. 

कुलदीप बाबूराव जाधव (वय 34, रा. बिबवेवाडी, मूळ बसव कल्याण, कर्नाटक) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. सोमवारी मध्यरात्री फिर्यादी हे घरात झोपले होते. हवा येण्यासाठी त्यांनी दरवाजे उघडे ठेवले होते. मध्यरात्री पाऊणच्या सुमारास आरोपी त्यांच्या घरात घुसला. त्या वेळी फिर्यादीच्या पत्नीशेजारी मुलगी झोपली होती. आरोपीने मुलीला उचलून घराबाहेर नेले. काही वेळानंतर मुलीच्या आईला जाग आली, त्यांना मुलगी शेजारी नसल्याचे लक्षात आले. त्यांनी घरातील इतर लोकांना जागे केले आणि मुलगी घरात नसल्याचे सांगितले. त्यांनी घरात तिचा शोध घेतला. मात्र ती न सापडल्याने फिर्यादी, त्यांची पत्नी घराबाहेर आले. त्यांना लोहमार्गाच्या जवळून एक जण पळताना दिसला. त्यांनी त्याचा पाठलाग करून पकडले, तेव्हा त्याच्या खांद्यावर फिर्यादीची मुलगी होती. फिर्यादीने मुलीला ताब्यात घेऊन पत्नीकडे दिले आणि आरोपीला पकडून ठेवले होते. त्याला घराजवळ आणले, तेव्हा गोंधळ ऐकून शेजारील लोकही जागे झाले होते. नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला कळवून आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: pune news crime

टॅग्स