पोलिस असल्याचे भासवीत टपरीवाल्याकडे मागितली खंडणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

पुणे - एका साप्ताहिकाचे प्रतिनिधी ओळखपत्र दाखवून पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करत पानटपरीवाल्याकडे पाच हजारांची खंडणी मागणाऱ्या दोघांना समर्थ पोलिसांनी रविवारी अटक केली. "पोलिस ऑफिसर' नावाच्या साप्ताहिकाचे ते प्रतिनिधी आहेत. आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी मोईद्दीन अब्दुल कादरी यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून विजय ऊर्फ बापू ज्ञानोबा कांबळे (वय 46, रा. उषःकाल बिल्डिंग, रुपीनगर, तळवडे) व प्रसाद अरविंद यादव-देशमुख (36, रा. नाना पेठ, मॉडर्न बेकरीजवळ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

कादरी यांची "पॉवर हाउस' चौकात "आनंद पान शॉप' नावाची पानटपरी आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास दोघे आरोपी त्यांच्याकडे आले. "पोलिस ऑफिसर' असे ठळक लाल रंगाच्या अक्षरात लिहिलेले ओळखपत्र दाखवीत पोलिस अधिकारी असल्याचे सांगून पान टपरीची झडती घेतली. या वेळी त्यांना गुटख्याची काही पाकिटे आढळल्याने गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. "गुन्हा दाखल करायचा नसेल तर रोख पाच हजार रुपये दे, अन्यथा कायमचे तुरुंगात पाठविण्यात येईल,' असा दमही दिला.

फिर्यादीला त्यांचा संशय आल्याने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडे असलेल्या ओळखपत्रावरून ते साप्ताहिक नोंदणीकृत आहे का, त्यांनी अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत, याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक पी. आर. शिकलगार करीत आहेत.

आभासी ओळखपत्रे
पोलिस अधिकारी असल्याचा आभास निर्माण करणारी ओळखपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यावर मोठ्या अक्षरात "पोलिस ऑफिसर' असे छापले असून त्यावर अगदी बारीक अक्षरात "साप्ताहिक' असा उल्लेख आहे. त्याखाली फोटो आणि दोघांची पदे, क्षेत्रदेखील लिहिली आहेत. ओळखपत्र बघताच "पोलिस अधिकारी' असल्याचा भास होईल, असे बनविण्यात आल्याची माहिती समर्थ पोलिस ठाण्याचे विनोद वीर यांनी दिली.

Web Title: pune news crime