बेपत्ता मुलांच्या शोधासाठी पाळेमुळे खणून काढा 

अनिल सावळे 
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

आई-वडिलांच्या कुशीत गाढ झोपलेल्या बाळाचे अपहरण केल्याची घटना शहरात नुकतीच घडली. भीक मागण्याच्या उद्देशानेच बाळाचे अपहरण झाल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर वाढला आहे. ही बाब काही चौकांमध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे. पोलिसांनी अशा घटनांच्या मुळापर्यंत जाऊन, पाळेमुळे खणून काढण्याची गरज आहे. तसे झाल्यास अनेक धक्‍कादायक बाबी समोर येतील. 

बंडगार्डन येथील मालधक्‍का चौकात गरीब दांपत्य वास्तव्यास आहे. चौकात उभे राहून दिवसभर खेळणी विकून  त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे. त्यांना 14 महिन्यांचे बाळ आहे. राहण्यासाठी डोक्‍यावर छप्पर नसल्यामुळे मालधक्‍का चौकातील पदपथच त्यांचे झोपण्याचे ठिकाण. सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे हे दांपत्त्य बाळाला दोघांच्या मध्ये घेऊन झोपले होते; परंतु परवा मध्यरात्री अनोळखी व्यक्‍तींनी आई-वडिलांच्या कुशीत झोपलेल्या त्या बाळाला घेऊन पळ काढला. तीनचाकी सायकलवर आलेली महिला आणि पुरुषाने त्या बाळाचे अपहरण केले. त्यांच्यासोबत एक लहान मुलगीही होती. ते बाळाला उचलून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या बाळाचा शोध घेतला; परंतु अद्याप त्यांच्या काही हाती लागलेले नाही. 

या घटनेव्यतिरिक्‍त शहरात अल्पवयीन मुला-मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामागची कारणेही तशी वेगवेगळी आहेत. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने वेश्‍याव्यवसायावर टाकलेल्या छाप्यात अल्पवयीन मुलीही आढळून येतात. त्यावरून लहान मुलां-मुलींच्या अपहरणांच्या घटनांमागे गुन्हेगारी टोळ्या सक्रिय असाव्यात, याची दाट शक्‍यता आहे. अशा टोळ्यांचा शोध घेऊन त्यांची पाळेमुळे खणून काढण्याची गरज आहे. जेणेकरून यापुढे लहान मुलांच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण कमी होईल. 

पालकांनी आपल्या मुलां-मुलींच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. अल्पवयीन मुलांच्या कल्याणासाठी स्वयंसेवी संस्थांकडूनही सातत्याने प्रयत्न सुरू असतात. बेपत्ता मुलांच्या समस्या दूर करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने समिती स्थापन केली आहे. या गंभीर मुद्याला प्राधान्यक्रम देत या समितीने शिफारसी प्रस्तावित केल्या आहेत. याबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस महासंचालकांनी योग्य ते निर्णय घ्यावेत. पोलिस अधिकाऱ्यांनी संवेदनशील आणि जबाबदारीने काम करावे. बेपत्ता मुलांच्या शोधासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात विशेष पथक असणे आवश्‍यक आहे. बेपत्ता मुलांची ओळख पटल्यानंतर त्यांची पोलिस ठाण्यात नोंद करणे गरजेचे आहे. बेपत्ता मुलांच्या तक्रारीच्या नोंदी कायम ठेवल्या पाहिजेत. याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास अनेक प्रश्‍न सुटण्यास मदत होईल.

Web Title: pune news crime