पालकांना लुबाडणारा ठग सापडेना!

अनिल सावळे
शुक्रवार, 14 जुलै 2017

वानवडी परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्याचे आमिष दाखवून एका ठगाने ४० पालकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली. शिवाय, मुलांच्या शैक्षणिक आणि इतर दाखल्यांसह पळ काढला. त्या मुलांना शाळेत प्रवेश न मिळाल्याने पालक हवालदिल झाले आहेत. बरेच दिवस उलटूनही वानवडी पोलिसांना आरोपी सापडत नाही, हे विशेष.

वानवडी परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्याचे आमिष दाखवून एका ठगाने ४० पालकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली. शिवाय, मुलांच्या शैक्षणिक आणि इतर दाखल्यांसह पळ काढला. त्या मुलांना शाळेत प्रवेश न मिळाल्याने पालक हवालदिल झाले आहेत. बरेच दिवस उलटूनही वानवडी पोलिसांना आरोपी सापडत नाही, हे विशेष.

शैलेश गिडिया यांना त्यांच्या मुलाला वानवडीतील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यायचा होता. अनिल शिंदे नावाच्या व्यक्‍तीकडून मुलाला या शाळेत प्रवेश मिळेल, असे गिडिया यांना त्यांच्या मित्राने सांगितले. त्यानुसार त्यांनी शिंदे याची भेट घेतली. शाळेत ‘प्री नर्सरी’ वर्गात मुलाला हमखास प्रवेश मिळवून देतो, असे सांगून शिंदे याने त्यांना विश्‍वासात घेतले. मुलाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न बघणाऱ्या या पित्याने पैसे देण्याचे मान्य केले. शिंदे हा त्यांना पुस्तके घेऊन देण्याच्या निमित्ताने शाळेत घेऊन गेला. शाळेच्या कॅम्पसमधील काही कर्मचारी आणि शिपाई शिंदे याला चांगले ओळखत होते. त्यामुळे गिडिया यांच्या मनात शंका आली नाही. पैसे दिल्यानंतर शिंदे याने त्यांना पुस्तके घेऊन दिली. 

कॅम्पमधून मुलाला गणवेश घ्या, असे सांगितले. त्यानुसार गिडिया यांनी मुलासाठी हौसेने शाळेचा गणवेश आणला. दहा-बारा दिवसांनी एका मोबाईलवरून गिडिया यांना मेसेज आला. १५ जून रोजी शाळेचे प्रमुख आणि प्रिन्सिपलसोबत आपली बैठक आहे, त्याचदिवशी सकाळी सात वाजून ३५ मिनिटांनी हजर रहा, असे सांगण्यात आले. मात्र, आदल्या दिवशी दुसरा मेसेज आला. त्यात १५ ऐवजी १९ जून रोजी येण्यास सांगण्यात आले.

दरम्यानच्या काळात शिंदे याने शाळेत पहिल्या तिमाहीची ११ हजार ३६० रुपये शुल्क भरलेली पावतीही आणून दिली. तसेच, मुलाला शाळेत पाठवून देण्यास सांगितले. शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे वडिलांनी मुलाला शाळेत सोडले. दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर शिक्षिकेने प्रवेश शुल्क भरलेली ‘ती’ पावती तपासून घेण्यास सांगितले. त्यानुसार कार्यालयात चौकशी केली असता ती पावती बनावट असल्याचे सांगण्यात आले. त्यावर गिडिया यांना मोठा धक्‍काच बसला. 

ते शाळेत चौकशीसाठी गेल्यानंतर फसवणूक झालेल्या ४० पालकांची भेट झाली. सर्व पालकांनी प्रिन्सिपल यांच्याशी भेटून त्यांची फसवणूक झाली आहे. पण मुलांचे वर्ष वाया घालवू नका, अशी विनंती केली. मात्र, त्यांनी पालकांचे काहीही ऐकण्यास नकार दिला. त्यावर पालकांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी शिंदे याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व पालक शिंदे याच्या घरी गेले. पण तो बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात येत आहे. काही पालकांनी या शाळेतील दोन व्हॅनचालकांमार्फतही शिंदे याला पैसे दिल्याचे समजते. मात्र, आरोपी पसार असून पोलिसांचा तपासही पुढे सरकलेला नाही.  
 

दलालांपासून सावधान !
शहरात दरवर्षी शाळेत प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक झाल्याच्या घटना समोर येतात. परंतु, बऱ्याचदा पालक पुढे येत नाहीत. या घटनेत पालकांनी धाडस दाखवत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्‍या आवळणे अपेक्षित आहे. शाळेची बदनामी टाळण्यासाठी संबंधित शाळा व्यवस्थापनाने खबरदारी घेण्याची गरज आहे. तसेच, पालकांनीही प्रवेशासाठी दलालांपासून दूर राहून नियमानुसार प्रवेश घेतल्यास फसवणुकीच्या घटना घडणार नाहीत.

Web Title: pune news crime in pun e