पोलिसांनीच नागरिकाला लुबाडले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

औरंगाबादच्या व्यक्तीकडून ई-मेलवर तक्रार; दोघांनी 25 हजार घेतल्याचे उघड

औरंगाबादच्या व्यक्तीकडून ई-मेलवर तक्रार; दोघांनी 25 हजार घेतल्याचे उघड
पुणे - औरंगाबादच्या एका व्यक्तीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी 25 हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित व्यक्तीने ई-मेलद्वारे तक्रार केल्यानंतर त्या दोन्ही कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. गणेश मारुती सोनवणे आणि अनिल हनुमंत रासकर अशी त्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुंबई येथे मंत्रालयात काही कामानिमित्त गेले होते. ते सहा मे रोजी मोटारीने त्यांच्या मित्रासह पुण्यात आले होते. मित्राला घरी सोडून सदाशिव पेठेतील एका लॉजवर जाण्यासाठी ते लक्ष्मी रस्त्याने रविवार पेठ चौकीसमोरील चौकात आले. त्यावेळी तेथे पोलिस कर्मचारी सोनवणे आणि रासकर हे दोघे जण नाकाबंदीसाठी तैनात होते. त्यांनी त्यांची मोटार अडवून चावी, मोबाईल आणि लायसन्स काढून घेतले. रेडलाईट एरियात आल्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल, अशी धमकी दिली. तसेच गुन्हा दाखल न करण्यासाठी 30 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. भीतीपोटी ते 25 हजार रुपये देण्यास तयार झाले. त्यांनी त्या व्यक्‍तीच्या एटीएम कार्डवरून 15 हजार रुपये आणि रोख दहा हजार जबरदस्तीने काढून घेतले. पैसे मिळाल्यानंतर मोबाईल आणि साहित्य परत केले.

औरंगाबादला गेल्यानंतर फिर्यादीने ई-मेलद्वारे याची तक्रार केली. त्यावरून फरासखाना ठाण्यात दोघा कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: pune news crime in pune