नोकरीसाठी फोन आलाय? जरा जपून...

अनिल सावळे
रविवार, 24 सप्टेंबर 2017

खोट्या आमिषाने अनेक बेरोजगारांची फसवणूक

 

पुणे: ऑनलाइन नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुण-तरुणींना लुबाडण्याचे प्रकार वाढले आहेत. नोकरी देण्याच्या बहाण्याने काही संस्था बेरोजगार तरुणांना लुबाडून पसार होतात. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर नव्या नावाने संस्था सुरू करून पुन्हा बेरोजगार तरुणांची फसवणूक केली जाते. पोलिसांनी अशा सायबर गुन्हेगारांची पाळेमुळे शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बेरोजगार तरुणांमधून केली जात आहे.

 

खोट्या आमिषाने अनेक बेरोजगारांची फसवणूक

 

पुणे: ऑनलाइन नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुण-तरुणींना लुबाडण्याचे प्रकार वाढले आहेत. नोकरी देण्याच्या बहाण्याने काही संस्था बेरोजगार तरुणांना लुबाडून पसार होतात. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर नव्या नावाने संस्था सुरू करून पुन्हा बेरोजगार तरुणांची फसवणूक केली जाते. पोलिसांनी अशा सायबर गुन्हेगारांची पाळेमुळे शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बेरोजगार तरुणांमधून केली जात आहे.

 

उदाहरण- 1
प्रमोद ठाकूर या 33 वर्षीय युवकाला अनोळखी व्यक्‍तीचा फोन आला. "आपली टाटा मोटर्स कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापकपदावर नियुक्‍ती झाली आहे. नोंदणी शुल्क म्हणून अडीच हजार रुपये भरा', असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यानुसार प्रमोदने पैसे भरले. त्यानंतर त्या व्यक्तीने वेगवेगळी कारणे सांगून एक लाख 63 हजार रुपये घेतले; मात्र नोकरी मिळाली नाही. नवी दिल्लीच्या जनकपुरी येथील रिषभ मेहता याने प्रमोदची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले. रिषभने यापूर्वीही अशा प्रकारे कोथरूडच्या एका तरुणाची फसवणूक केली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

उदाहरण- 2
वारजे-माळवाडी येथील वृषालीला एकाने परदेशात नोकरीचे आमिष दाखवून कंपनीच्या ई-मेलवर माहिती भरण्यास सांगितले. वृषालीने ऑनलाइनद्वारे माहिती पाठविली. तिला नोकरीसाठी बॅंक खात्यात 50 हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. तिने ती रक्‍कम भरली; परंतु नोकरी मिळाली नाही. याबाबत तिने सायबर सेलकडे तक्रार दिली. त्यावर पोलिसांनी नवी दिल्लीतून आशिष साजधन, सूरजकुमार जॉ आणि समीरकुमार सिंग या तिघांना अटक केली.

गुन्ह्याची पद्धत
बेरोजगार तरुण नोकरीशी संबंधित संकेतस्थळांवर ऑनलाइन माहिती भरत असतात. त्या माहितीचा वापर करून सायबर गुन्हेगार बेरोजगार तरुणांना हेरून फसवणूक करत आहेत. अमूक कंपनीतून बोलत असल्याचे सांगून त्या तरुणाला आपली शैक्षणिक पात्रता ही आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्याची आहे. त्यामुळे आपणास फोन केला असून, आपण ऑनलाइन अर्ज भरा, असे सांगितले जाते. त्यानंतर अनोळखी व्यक्‍तीकडून बॅंक खाते क्रमांक दिला जातो. त्यात प्रवेश शुल्क भरल्यानंतर तोंडी परीक्षेस पात्र ठरल्याचे सांगून फोनवर मुलाखत घेतली जाते. मोठ्या पगाराची नोकरी लागल्याचे सांगून विविध कायदेशीर बाबी पूर्ण करण्याच्या बहाण्याने पैशांची मागणी केली जाते. त्यानुसार बेरोजगार तरुण दिलेल्या बॅंक खात्यात पैसे भरतात; मात्र नोकरी कधी मिळणार, या प्रश्‍नाचे उत्तर शेवटपर्यंत मिळत नाही. प्रत्यक्ष कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, कंपनीने आपल्याला नोकरीची कोणतीही ऑफर दिलेली नाही, असे सांगितले जाते.

काय करावे, काय टाळावे...
- केवळ विश्‍वासपात्र सुरक्षित कंपनीच्या संकेतस्थळांवर नोकरीसाठी ऑनलाइन माहिती पाठवावी.
- नोकरीविषयक माहिती पाठविताना शैक्षणिक अथवा वैयक्‍तिक माहितीची कागदपत्रे पाठवू नयेत.
- नोकरीबाबत कॉल अथवा ई-मेल प्राप्त झाल्यास संबंधित कंपनीच्या जवळच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन चौकशी करावी.
- नोकरी पुरविणाऱ्या संस्थेबाबत खात्री झाल्यानंतरच नोंदणी शुल्क, प्रोसेसिंग शुल्क आणि व्हेरिफिकेशन शुल्क द्यावे. संबंधित संस्थेच्या कार्यालयात जाऊन पैसे भरल्यास अधिक उत्तम.

गुन्हा घडल्यावर काय कराल...
- फसवणूक झाल्यानंतर संबंधित व्यक्‍तीशी फोनवर संपर्कात राहून सायबर सेलकडे तक्रार करा. जेणेकरून ती व्यक्‍ती पोलिसांच्या जाळ्यात अडकेल. भरलेली रक्‍कम परत मिळवून देतो, असे म्हणून पुन्हा पैसे भरण्यास सांगितले जाते. त्या वेळी पैसे भरू नयेत.
- नोकरीसाठी कोणाच्याही बॅंक खात्यात पैसे जमा करू नयेत.
- संबंधित बॅंक खात्याची, तसेच पत्रव्यवहार आणि ई-मेल असल्यास त्याची माहिती घेऊन सायबर सेलच्या विभागात पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

Web Title: pune news cyber crime job phone