यंदा दहीहंडीचे फेसबुक लाइव्ह 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

पुणे - यंदाची दहीहंडी आठ की नऊ थर लावून फुटणार? की सहा-सात थरांवरच फुटणार? पुण्यातली गोविंदापथके आठ थरांपर्यंत हंडी फोडू शकले नाहीत, तर मुंबईच्या पथकांना संधी देण्याचा निर्णय काही दहीहंडी उत्सव मंडळांनी घेतला आहे. त्यामुळे यंदाची हंडी आठव्या थरावर की नवव्या थरावर फुटणार याची उत्सुकता निर्माण झाली असून, मंडळांच्या कार्यकर्त्यांमार्फत फेसबुक पेजवरच हंडी फोडण्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 

पुणे - यंदाची दहीहंडी आठ की नऊ थर लावून फुटणार? की सहा-सात थरांवरच फुटणार? पुण्यातली गोविंदापथके आठ थरांपर्यंत हंडी फोडू शकले नाहीत, तर मुंबईच्या पथकांना संधी देण्याचा निर्णय काही दहीहंडी उत्सव मंडळांनी घेतला आहे. त्यामुळे यंदाची हंडी आठव्या थरावर की नवव्या थरावर फुटणार याची उत्सुकता निर्माण झाली असून, मंडळांच्या कार्यकर्त्यांमार्फत फेसबुक पेजवरच हंडी फोडण्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 

दहीहंडीच्या उंचीवर घातलेली वीस फुटांची मर्यादा न्यायालयाने उठविली. तसेच हंडी फोडणाऱ्या गोविंदाचे वय चौदा वर्षांपुढील असावे, असा आदेश दिला. पुण्यातल्या हंड्या साधारणतः सात थरांपर्यंत फुटतात. यापूर्वी नऊ थर लावून हंडी फोडल्याची उदाहरणे आहेत. न्यायालयाच्या निर्णयामुळे यंदा अधिक उंचावरही हंडी बांधण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. दरम्यान, हंडी किती उंचावर असावी. याबाबत राज्य सरकारने अद्यापही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

गेल्या काही वर्षांपासून निर्बंध लादल्याने सहा ते सात थरांवर हंडी फोडण्यात येत नव्हती. आता मात्र बंदी उठविल्यामुळे दहीहंडी उत्सव मंडळांमार्फतही गोविंदांच्या सुरक्षेबाबत काय उपाययोजना करण्यात येणार आहे, हेही पाहायला लागेल. 

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी; उद्या गोपाळकाला 
श्रावण वद्य अष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमी सोमवारी (ता. १४) आहे. काही जण जन्माष्टमीचा उपवासही करतात. श्रीकृष्ण जन्म रात्री बारानंतर साजरा होतो. त्यामुळे उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा. श्रीकृष्णाचा जन्मसोहळा झाल्यानंतर गोपाळकाला अर्थात दहीहंडी उत्सवाचा आनंद घेण्याची प्रथा आहे, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

गणपतीची आरती मंडळाच्या फेसबुक पेजवर आम्ही अपलोड करतो. यंदाच्या वर्षी मंडळांच्या कार्यकर्त्यांमार्फत हंडी फोडतानाचे फेसबुक लाइव्ह करणार आहोत. पुण्यातल्या गोविंदा पथकांनी जर आठ थरांपर्यंत हंडी फोडली नाही, तर मुंबई, माजगाव येथून आणि ठाणे येथून येणाऱ्या गोविंदा पथकांना संधी देणार आहोत.
- बाळासाहेब मारणे,  अध्यक्ष, हुतात्मा बाबूगेनू मंडळ 

हंडी बांधताना आम्ही उंचावर बांधतो. परंतु गोंविदा पथक आल्यावर हंडी खाली घेतो. त्यामुळे सहा ते सात थरांवर आमच्या मंडळाची हंडी फोडली जात नाही. दरवर्षीची ही परंपरा असते. गोपाळकाल्याचा हा कार्यक्रम फेसबुक लाइव्ह पाहता येईल.
-प्रकाश चव्हाण, अध्यक्ष, सुवर्णयुग तरुण मंडळ  

न्यायालयाने निर्बंध उठवले तरीही आमच्या मंडळाच्या दहीहंडीची उंची कमीच असते. कारण गोविंदांची सुरक्षितता महत्त्वाची असते. पाच ते सहा थरांपर्यंतच हंडी फोडतो. या दिवशी नादब्रह्म पथक दरवर्षी नव्या तालाचे उद्‌घाटन करते. गेल्या वर्षीपासूनच मंडळातर्फे फेसबुक लाइव्ह करतो. त्यामुळे अनेकांना हंडी फोडण्याचा आनंद घरबसल्याही घेता येतो.
-शेखर साळुंखे, अध्यक्ष, शनिवार मित्र मंडळ

Web Title: pune news dahihandi facebook live