सणवारात डाळ महाग!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

मागणीत वाढ, आयातीवरील निर्बंधाचा परिणाम
पुणे - सणवारासाठी वाढलेली मागणी आणि आयातीवर घातलेले निर्बंध यामुळे घाऊक बाजारात डाळींच्या भावांत पुन्हा वाढ झाली आहे. तूरडाळ

मागणीत वाढ, आयातीवरील निर्बंधाचा परिणाम
पुणे - सणवारासाठी वाढलेली मागणी आणि आयातीवर घातलेले निर्बंध यामुळे घाऊक बाजारात डाळींच्या भावांत पुन्हा वाढ झाली आहे. तूरडाळ
प्रतिकिलोमागे दहा रुपये, मूगडाळ अकरा, हरभरा डाळ पाच, तर उडीद डाळ सहा रुपयांनी महागली आहे. मसूर डाळीच्या भावातही प्रतिकिलोमागे साडेतीन रुपयांची वाढ झाली आहे. ही भाववाढ काही दिवस कायम राहील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

गेल्या वर्षी डाळींच्या भावांत तेजी निर्माण झाली होती. डाळींच्या भावांनी आत्तापर्यंतचे उच्चांकही नोंदविले होते. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला आणि उत्पादन वाढल्याने या वर्षी बाजारात डाळींचे भाव घसरले. हे भाव हमीभावापर्यंत खाली आले होते. त्यातच मागणी नसल्याने भाव गेल्या तीन महिन्यांपासून स्थिर राहिले होते. गेल्या दहा दिवसांपासून अचानक डाळींच्या भावांत तेजी निर्माण झाली आहे. मागणीत झालेली वाढ, तूर आयातीवर निर्बंध लादल्याचे वृत्त प्रसारित झाल्याने भावांत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यामुळे वाढले भाव
मार्केट यार्ड येथील व्यापारी नितीन नहार म्हणाले, 'डाळींचे भाव या वर्षी खूप कमी झाले होते. भाव त्याहून कमी होण्याची शक्‍यता नव्हती. या वर्षी पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाने चांगली हजेरी लावली असली, तरी कडधान्याचे उत्पादन चांगले होणाऱ्या मराठवाडा, विदर्भ या भागात पाऊस समाधानकारक झालेला नाही. त्यातच कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश येथील उत्पादनाला लहरी हवामानाचा फटका बसला आहे. यामुळे कडधान्यांचे उत्पादन कमी होईल अशी चर्चा आहे. परिणामी, ही भाववाढ झाली आहे. त्याचप्रमाणे सध्या सणांचे दिवस असल्याने मागणी वाढू लागली आहे.''

डाळी, कडधान्यांचे भाव गेल्या वर्षभरापासून सातत्याने वर-खाली होत आहेत. आत्ता निर्माण झालेली तेजी किती काळ राहील याचा अंदाज बांधणे कठीण आहे. परंतु भाव कमी होतील अशी शक्‍यता तूर्तास दिसत नाही. महाराष्ट्र आणि इतर कडधान्य उत्पादक राज्यांतील उत्पादनाची नेमकी माहिती समोर आल्यानंतरच वस्तुस्थिती समोर येईल. या वर्षी उत्पादन चांगले झाले आहे, त्यामुळे उत्पादकांकडे साठा आहे. त्याचवेळी भाव कमी असल्याने खरेदीदारांकडूनही आवश्‍यक तेवढीच खरेदी गेल्या काही महिन्यांत केली जात होती. पुरवठा साखळीत मालाचा तुटवडा निर्माण झाल्यानेच मागणी वाढू लागली आहे.
- विजय राठोड, व्यापारी

डाळींचे भाव (प्रतिक्विंटल)
दहा दिवसांपूर्वी आज
तूरडाळ : 5,400 - 6,400
मूगडाळ : 5,700 - 6,800
उडीद डाळ : 5,500 - 6,100
हरभरा डाळ : 6,400 - 6,900
मसूर डाळ : 4,350 - 4,700

Web Title: pune news dal rate increase